पुण्याहून जम्मू काश्मीरला 1 हजार 27 विद्यार्थी व नागरिक रवाना
Ekach Dheya
जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी संबंधित प्रशासनाशी केला पाठपुरावा
पुणे : राज्य शासनाच्या वतीने जम्मू-काश्मीर प्रशासनाशी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पाठपुरावा केल्यानंतर येथील नागरिकांना परवानगी मिळाली, व जम्मू काश्मीर चे 1 हजार 27 विद्यार्थी व नागरिक विशेष रेल्वेने नुकतेच पुण्यातून रवाना झाले.
लॉकडाऊनमुळे महाराष्ट्रात अडकलेल्या जम्मू काश्मीर मधील या विद्यार्थी व नागरिकांना त्यांच्या राज्यात अटी-शर्तींची पूर्तता करून जाऊ देण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी संबंधित प्रशासनाची परवानगी मिळवण्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा केला. तेथील परवानगी मिळाल्यानंतर विशेष रेल्वेने हे नागरिक रवाना करण्यात आले.
पुणे जिल्ह्यासह कोल्हापूर, सोलापूर, नंदुरबार, अहमदनगर, भिवंडी, रायगड आदी जिल्ह्यातील विद्यार्थी व नागरिकांचा यात समावेश होता. सोशल डिस्टनसिंगचे पालन करुन त्यांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती. तत्पूर्वी या नागरिकांकडून हमीपत्र भरुन घेणे, आरोग्य तपासणी करण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्यात आली. या कामकाजाचे नियोजन उपजिल्हाधिकारी तथा समन्वय अधिकारी नीता शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे शहर तहसीलदार तृप्ती कोलते-पाटील व तहसीलदार विवेक जाधव यांनी केले.
हे विद्यार्थी व नागरिकांना मदत करण्याबरोबरच रेल्वे तून जाताना त्यांना फूड पॅकेट व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सरहद संस्थेचे संजय नहार यांनी केली.