Site icon साप्ताहिक एकच ध्येय

यूएईच्या परराष्ट्र मंत्र्यांनी घेतली पंतप्रधान मोदी यांची भेट

नवी दिल्ली : संयुक्त अरब अमिरातीचे (यूएई) परराष्ट्रमंत्री शेख अब्दुल्ला बिन झाएद अल नहिआत भारत दौऱ्यावर असून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

संयुक्त अरब अमिरातीचे राष्ट्रपती आणि युवराज यांनी दिलेल्या शुभेच्छा परराष्ट्रमंत्र्यांनी पंतप्रधानांपर्यंत पोहचवल्या.

संयुक्त अरब अमिरातीच्या दौऱ्यात केलेल्या आदरातिथ्याची आठवण पंतप्रधान मोदी यांनी करून दिली तसेच यूएईचे राष्ट्रपती आणि युवराज यांना उत्तम आरोग्य आणि यशासाठी शुभेच्छा दिल्या. दोन्ही देशांमधले संबंध गेल्या पाच वर्षात दृढ झाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.

भारत-यूएई दरम्यान संबंध यापूर्वी कधी इतके चांगले नव्हते असे यूएईचे परराष्ट्रमंत्री म्हणाले. उभय देशांच्या जनतेच्या हितासाठी तसेच या प्रांतात शांतता, स्थैर्य आणि समृद्धी नांदावी यासाठी द्विपक्षीय सहकार्य वृद्धींगत करण्याची यूएईची रुपरेखा त्यांनी विशद केली.

व्यापार, अर्थव्यवस्था, ऊर्जा, पर्यटन आणि जनतेमधले संबंध या सर्वच क्षेत्रातले सहकार्य नव्या उंचीवर नेण्यासाठी यूएईबरोबर काम करण्यासाठी कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार पंतप्रधानांनी केला.

Exit mobile version