पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि क्रिस्ना डायग्नोस्टीक यांचे सहकार्याने कोविड पूर्व चाचणी वस्ती पातळीवर जाऊन प्रयोग शाळेत घेण्यात येणार असून अशी अत्याधुनिक प्रयोगशाळा विकसित करण्यात आली असून त्याचा शुभारंभ महापौर माई ढोरे यांच्या हस्ते महापालिका भवनात करण्यात आला.
यावेळी खासदार श्रीरंग ऊर्फ आप्पा बारणे, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, आयुक्त श्रावण हर्डीकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे, क्रिस्ना डायग्नोस्टीकच्या व्यवस्थापकीय संचालिका पल्लवी जैन, कार्यकारी अधिकारी अनिल साळुंके, वैद्यकीय विभागाचे संचालक डॉ. किरणकुमार भिसे आदी मान्यवर उपस्थित होते.
शुभारंभ करण्यात आलेली कोविड – 19 बस प्रयोगशाळा ही पिंपरी चिंचवड शहरातील पहिली अत्याधुनिक प्रयोगशाळा आहे. सदर प्रयोगशाळा वस्ती पातळीवर जाऊन काम करणार असून याव्दारे कोविड – 19 पूर्व चाचणी, मोबाईल एक्सरे, रक्त तपासणी व रक्तदाब तपासणी करण्यात येणार आहे. यामार्फत जास्तीत जास्त नागरिकांची तपासणी करण्यात येणार आहे. प्राथम्याने कंटेन्मेंट झोनमधील हायरिस्क कॉन्टॅक्ट मधील नागरिक व दुर्धर आजाराने त्रस्त व जेष्ठ नागरिकांची कोवीड पूर्व चाचणी या प्रयोगशाळेत विनामूल्य करण्यात येणार आहे.