नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड 19 महामारीच्या कसोटीच्या काळात शासन शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. पीक कर्ज मिळवून देण्यासंदर्भात शासन रिझर्व बँकेकडे पाठपुरावा करत आहे असं मुख्यमंत्री म्हणाले.
राज्यात खरीप हंगामाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते.दर्जेदार कृषी उत्पादन निर्यातीतून अर्थव्यवस्थेला चालना मिळेल असं ते म्हणाले. राज्यशासनाच्या महात्मा जोतिराव फुले कर्जमाफी योजनेअंतर्गत 32 लाख पैकी 19 लाख खात्यांमधे कर्जमाफीपोटी 12 हजार कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत.निधीच्या कमतरतेमुळे आणखी 11लाख 12 हजार खात्यांमधे 8हजार100कोटी रुपये जमा होणं बाकी आहे, अशी माहिती बैठकीत देण्यात आली.
येत्या 18 जूनला राज्यात मोसमी पावसाचं आगमन होण्याची शक्यता असून यंदा 1 कोटी 40 लाख 11 हजार हेक्टर क्षेत्र लागवडीखाली येणार आहे.पैकी 60% जमिनीत म्हणजे 82 लाख हेक्टरवर सोयाबीन,आणि कापूस लागवड असेल.अशी माहिती बैठकीत देण्यात आली. हंगामात एकूण 17 लाख 1 हजार क्विंटल बियाण्याची गरज असून त्यातलं 54 हजार टन बियाणं शेतकऱ्यांना वितरीत करण्यात आलं आहे.
लॉकडाऊनच्या काळात 9लाख,68 हजार 550 क्विंटल फळं आणि भाजीपाल्याची ऑनलाईन विक्री 3 हजार 212 केंद्रांमार्फत झाली. राज्यात उत्पादन झालेल्या 4 कोटी 10 लाख क्विंटल कापसापैकी 344 लाख क्विंटल खरेदी झाला असून उर्वरित कापूस खरेदी येत्या 20 जून पर्यंत पूर्ण होईल. त्याकरता 163 कापूस खरेदी केंद्र दररोज 2 लाख क्विंटल प्रमाणे खरेदी करत आहेत.