Site icon साप्ताहिक एकच ध्येय

‘रमजान ईद’ला नमाज घरीच अदा करणार !

मुस्लिम बांधवांचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांना आश्वासन

धुळे : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सध्या सर्वत्र दिसून येत आहे. धुळे जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून जिल्हा प्रशासन पुरेपूर प्रयत्न करीत आहे. केंद्र सरकार व राज्य शासनाच्या नियमांचे पालन करीत मुस्लिम बांधवांनी रमजान ईदची नमाज घरीच कुटुंबियांसह अदा करावी, असे आवाहन पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी येथे केले. या आवाहनाला प्रतिसाद देत मुस्लिम बांधवांच्या प्रतिनिधींनी रमजान ईदची नमाज घरीच अदा करण्यात येईल, असे आश्वासन दिले.

पालकमंत्री श्री.सत्तार धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी नवीन नियोजन सभागृहात मुस्लिम समाजातील प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष तुषार रंधे, आमदार डॉ. फारुक शाह, जिल्हाधिकारी संजय यादव, पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, महानगरपालिकेचे आयुक्त अजीज शेख, अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. राजू भुजबळ उपस्थित होते.

पालकमंत्री श्री.सत्तार म्हणाले, कोरोना विषाणूचे संकट सर्व जगाला भेडसावत आहे. या विषाणूचा प्रसार एका व्यक्तीपासून अन्य व्यक्तीस होण्याची शक्यता असते. या विषाणूचा संक्रमणाचा वेग पाहता नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहावे म्हणूनच संपूर्ण संचारबंदीचा (लॉकडाऊन) निर्णय घेण्यात आला आहे. या विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी एकमेकांपासून दूर राहणे, अनावश्यक गर्दी टाळणे आवश्यक आहे. त्यामुळे रमजान ईदची नमाज सामूहिक ठिकाणी अदा न करता घरीच अदा करीत जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे.

महानगरपालिकेने सर्व भागात स्वच्छता मोहीम राबवावी. पुरेसा पाणीपुरवठा करावा. आवश्यक तेथे सॅनिटाइझ करावे, असेही निर्देश पालकमंत्री श्री. सत्तार यांनी दिले.

धुळे शहरासह जिल्ह्यातील सर्व खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी आपापले दवाखाने सुरू करावेत, असे आवाहन पालकमंत्री श्री. सत्तार यांनी केले. त्यांनी सांगितले, की खासगी दवाखाने सुरू करण्यासाठी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, महानगरपालिका आयुक्त यांनी संयुक्तपणे प्रयत्न करावेत. जे दवाखाने सुरू होणार नाहीत, अशांचे परवाने रद्द करावेत. जिल्हा पुरवठा विभागाने प्रत्येक पात्र व्यक्तीला अन्नधान्याचा पुरवठा करावा. या कामात हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाई करावी. आवश्यक तेथे पर्यवेक्षक नियुक्त करावेत. त्यांच्या माध्यमातून अन्नधान्य वितरणाचे मोबाईलवर चित्रीकरण करावे, अशाही सूचना त्यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी श्री.यादव यांनी सांगितले, पालकमंत्री श्री. सत्तार यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. प्रत्येक माणसाला कोरोना विषाणूपासून दूर ठेवण्याचा जिल्हा प्रशासनाचा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी नागरिकही सहकार्य करीत आहेत. पोलीस अधीक्षक श्री.पंडित यांनी सांगितले, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यासाठी धुळेकरांचेही चांगले सहकार्य लाभत आहे. ड्रोन खरेदीसाठी पालकमंत्री महोदयांनी दहा लाख रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी आमदार डॉ. शाह, शव्वाल अन्सारी, साबीर शेख, मंजूर अन्सारी आदींनी मनोगत व्यक्त करीत रमजान ईदच्या दिवशी घरीच नमाज अदा करण्यात येईल, असे सांगितले.

Exit mobile version