नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय ईशान्य क्षेत्र विकास राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी म्हटले आहे की, कोविडनंतर भारत अधिक आत्मविश्वासाने उदयाला येईल आणि जगात प्रतिष्ठा मिळवेल. एका खासगी दूरचित्रवाणी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत डॉ जितेंद्र सिंह म्हणाले की, या संकट काळात सर्व भीती आणि अपेक्षा असूनही आपल्याला विश्वास आहे की आजपासून सहा महिन्यांनंतर जग भारताकडे आदराने पाहील आणि आपल्याबरोबर सहकार्य करायला उत्सुक असेल. एवढेच नाही, ते म्हणाले, भारत देखील उद्योग आणि व्यापाराचे सुरक्षित ठिकाण म्हणून देखील उदयास येईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योग्य वेळी जाहीर केलेल्या लॉकडाऊनमुळे भारताला कोविड नंतरच्या जगातील नव्या नियमांसाठी स्वतःला प्रशिक्षित करायला मदत झाली असे .डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले.
ते ईशान्य भारताचे जो सामान्यत: पर्यटनावर अवलंबून आहे, तिथले प्रभारी असल्यामुळे याबाबत खासकरुन जेव्हा त्यांना विचारले की कोविड महामारीचा कसा परिणाम होईल, त्यावर डॉ. जितेंद्र सिंग यांनी उत्तर दिले की ईशान्य प्रदेशाला पर्यटनात फायदा होईल आणि ते युरोप आणि अन्य पाश्चात्य देशातील पर्यटकांना आकर्षित करायला सुरुवात करेल. कारण कोरोनामुळे त्या देशांमधील बहुतेक पर्यटन रिसॉर्ट्ना कोरोनाची मोठी झळ बसली आहे. भारताचा ईशान्य भाग आहे जो तुलनेने कोरोनामुक्त आहे आणि सिक्किमसारख्या काही लोकप्रिय पर्यटनस्थळांवरसुद्धा कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही.
उद्योग आणि व्यापार याबद्दल डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले की, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेला प्रोत्साहन देण्याची भारताला ही संधी आहे. यासंदर्भात त्यांनी बांबूचे उदाहरण दिले ज्यामध्ये दरवर्षी 5000 ते 6000 कोटी रुपये उलाढाल आहे आणि अगरबत्ती व बांबूच्या इतर वस्तू आतापर्यंत अन्य देशांतून आयात केल्या जात असत. ते म्हणाले, आमच्या औषध निर्मिती फार्मा उद्योगाला यापूर्वीच चालना मिळाली आहे आणि कोविड -१९ च्या संदर्भातही आपण औषधे आणि लस तयार करण्याच्या दिशेने प्रयत्न करत आहोत जे निर्यातीलाही उपयोगी पडतील.
जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेशासाठी नुकत्याच जारी करण्यात आलेल्या अधिवास अधिसूचनेबद्दल विचारले असता डॉ जितेंद्र सिंह म्हणाले की 5 ऑगस्ट 2019 पासून सुरू झालेल्या या प्रक्रियेचा हा विस्तार आहे आणि आता ते आपल्या तार्किक निष्कर्षावर पोहोचले आहेत. या निर्णयाच्या सकारात्मक निकालाची जाणीव भावी पिढ्यांना होईल, असे ते म्हणाले.