महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडून राज्यातील जनतेला रमजान ईदच्या शुभेच्छा!
Ekach Dheya
घरात थांबून रमजान ईद साध्या पद्धतीने साजरी करण्याचे महसूलमंत्र्यांचे आवाहन
मुंबई : इस्लाममध्ये पवित्र रमजान महिन्याला अनन्यसाधारण महत्त्व आणि स्थान आहे. परंतु यावर्षीचा रमजान कोविड-१९ संकटाच्या सावटाखाली आल्यामुळे महिनाभर मुस्लिम बांधवांनी घरीच प्रार्थना करुन सरकारी नियमांचे पालनही केलेले आहे. आता रमजान ईदलासुद्धा घराबाहेर न पडता घरातच ईद साजरी करावी आणि समाजापुढे एक आदर्श घालून द्यावा, असे आवाहन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.
मंत्री श्री. थोरात म्हणाले, देशावर कोविड-१९ चे आलेले संकट पाहता सर्व मुस्लिम बांधवांनी साध्या पद्धतीने रमजानचा महिना घराबाहेर न पडता, गर्दी न करता शासनाने वेळोवेळी घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करुन पार पाडला. रामनवमी, हनुमानजयंती, गुढीपाडवा, महावीर जयंती, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीही सर्वांनी साध्या पद्धतीने व शांततेने साजरी केली, यंदाची ईदसुद्धा अशीच साजरी करावी तसेच ईदच्या निमित्ताने सर्व जाती धर्मातील गोरगरीब, गरजू, कामगार यांना आवश्यक ती मदत करावी हीच ईदी ठरेल. लॉकडाऊनचे उल्लंघन करू नये, मास्क वापरावा, सोशल डिस्टंसिंगचे पालन करावे, प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा न देता फोन, एसएमएस, व्हॉट्सअप सारख्या समाजमाध्यमाचा वापर करुन द्याव्यात, असे आवाहन करुन श्री. थोरात यांनी जनतेला रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत.