नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारच्या मिशन सागर मोहिमेअंतर्गत, कोव्हीड-१९ चा सामना करण्यासाठी आवश्यक असलेली साहित्य सामुग्री घेऊन निघालेलं भारतीय नौदलाचं केसरी हे जहाज, मॉरिशसला पोहोचलं आहे. या साहित्य सामुग्रीत मॉरिशसच्या जनतेसाठी, कोरोनाचा सामना करण्यासाठी अत्यावश्यक असलेली औषधं, तसच भारतीय आयुर्वेदिक औषधांचा समावेश आहे.
मॉरिशसच्या पोर्ट लुईस या बंदरावर हे जहाज काल पोहोचल्यानंतर झालेल्या एका अधिकृत समारंभात, मॉरिशसच्या वतीनं आरोग्य मंत्री डॉक्टर कैलाश जगत्पाल यांनी भारताकडून आलेली ही मदत स्वीकारली. या जहाजातून भारतीय नौदलाचं, डॉक्टर आणि निमवैद्यकीय कर्मचाऱ्यांचा सहभाग असलेलं १४ सदस्यांचं वैद्यकीय पथकही गेलं असून, ते मॉरिशसच्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना, तिथल्या कोव्हीडग्रस्तांवर उपचार करण्यात मदत करणार आहे. मिशन सागर मोहिमेअंतर्गत भारत आपल्या मित्र देशांना, कोव्हीडचा सामना करण्यासाठी सागरी मार्गानं वैद्यकीय मदत पुरवत आहे.