रेड झोनमधली विमानतळे सुरू करणे अत्यंत धोकादायक असल्याचे राज्याच्या गृहमंत्र्यांचे मत
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातली सध्याची कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाची स्थिती पाहता रेड झोनमधली विमानतळे सुरू करणे अत्यंत धोकादायक आहे, असे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले आहे. प्रवाशांचे केवळ थर्मल स्कॅनिंग करणे पुरेसे नाही स्वॅब तपासणी करावी लागेल.
रिक्षा, टॅक्सी, बस सेवा मोठ्या प्रमाणात चालवणेही शक्य नाही. त्यामुळे कोरोनाबाधित प्रवाशाला रेड झोनमध्ये आणून तिथला धोका वाढवणे चुकीचे आहे, असे त्यांनी ट्विटर संदेशाद्वारे म्हटले आहे. त्यामुळे सध्या तरी महाराष्ट्रात विमानसेवा सुरू होणे कठीण असल्याचे स्पष्ट झाले आहे.
विमानसेवा सुरू केल्यानंतर प्रवाशांना १४ दिवसांच्या विलगीकरणातून सूट देणे शक्य असल्याचं हवाई वाहतूक मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी म्हटले होतं. पण अनेक राज्यांनी विलगीकरणाचे नियम शिथिल करण्यास नकार दिला आहे. महाराष्ट्रा बरोबरच पंजाब आणि छत्तीसगड सरकारनेही देशांतर्गत विमानसेवा सुरू करण्याला विरोध केला आहे.