नवी दिल्ली : देशात काल कोरोनाचे 6 हजार 977 नवे रुग्ण आढळून आले, तर 154 जणांचा मृत्यू झाला. देशात काल सलग चौथ्या दिवशी सर्वात जास्त कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या नोंदवली गेली. आतापर्यंत 1 लाख 38 हजार 845 नागरिक कोरोना बाधित झाले, तर मृतांची संख्या 4 हजार 21 वर पोहोचली आहे. सध्या 77 हजार 103 रुग्ण उपचार घेत असून 57 हजार 720 रुग्ण बरे होऊन घरी परातल्याचं आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यानं सांगितलं. कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांमध्ये सर्वात जास्त, 1 हजार 635 रुग्ण महाराष्ट्रातले असून त्यापाठोपाठ गुजरात, मध्यप्रदेश, पश्चिम बंगाल या राज्यांचा क्रमांक लागतो.
राज्यात काल आणखी 3 हजार 41 रुग्णांना कोरोनाचं निदान झालं असून कोरोनाबाधीत रुग्णांची एकूण संख्या 50 हजार 231 झाली आहे. राज्यात काल 1 हजार 196 कोरोनाबाधित रुग्णांना, बरे झाल्यामुळे घरी सोडण्यात आलं. आतापर्यंत 14 हजार 600 रुग्णं बरे झाले आहेत. तर सध्या 33 हजार 988 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली .
राज्यात काल 58 कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद झाली असून एकूण संख्या 1 हजार 635 झाली आहे. या 58 मृत्यूंपैकी 38 मृत्यू हे मागील 24 तासातले, तर उर्वरित मृत्यू, हे 23 एप्रिल ते 20 मे या कालावधीतले आहेत. 58 मृत्यूंपैकी, 60 वर्षे किंवा त्यावरील 30 रुग्ण आहेत, तर 27 रुग्ण हे वय वर्षे 40 ते 59 या वयोगटातले आणि 1 जण 40 वर्षांखालील आहे. या 58 रुग्णांपैकी 40 जणांना, मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग,असे अतिजोखमीचे आजार होते.
राज्यात सध्या 2 हजार 283 कंटेनमेंट झोन म्हणजेच प्रतिबंधित क्षेत्र आहेत.