Site icon साप्ताहिक एकच ध्येय

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव देशाच्या अभिमानाची बाब, सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त यंदाचा इफ्फी महत्त्वपूर्ण- प्रकाश जावडेकर

पणजी : आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव ही देशाच्या अभिमानाची बाब आहे, यावर्षी इफ्फीने सुवर्णमहोत्सव गाठला आहे. त्यामुळे यावर्षीचा चित्रपट महोत्सव खास आहे, असे प्रतिपादन केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी केले. इफ्फीच्या सुकाणू समितीची पहिली बैठक पणजी येथे पार पडली, त्यानंतर आयोजित पत्रकारपरिषदेत श्री जावडेकर बोलत होते. याप्रसंगी मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत, माहिती व प्रसारण सचिव अमित खरे आणि इतर मान्यवरांची उपस्थिती होती.

20 ते 28 नोव्हेंबर 2019 दरम्यान सुवर्णमहोत्सवी चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. यावर्षी आंतरराष्ट्रीय ज्यूरी म्हणून ऑस्कर अकादमीचे अध्यक्ष जॉन बेली असणार आहेत. इफ्फीचा देशभर प्रसार आणि प्रचार व्हावा म्हणून सात शहरांमध्ये रोड शोचे आयोजन करण्यात येणार आहे.

महात्मा गांधीजींच्या 150 व्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त इफ्फीत एका प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच चित्रपट तंत्रज्ञानविषयक व्यावसायिक प्रदर्शनही आयोजित केले जाणार आहे. महोत्सवादरम्यान लोकप्रिय चित्रपटांना मिळणारा वाढता प्रतिसाद पाहता यावर्षी खासगी चित्रपटगृहांमध्येही सिनेमे प्रदर्शित करण्याचा विचार असल्याचे श्री जावडेकर म्हणाले.

विद्यार्थ्यांना चित्रपटविषयक बाबींचा अनूभव मिळावा यासाठी भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्था (एफटीआयआय) आणि सत्यजित रे चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेच्या विद्यार्थांना चित्रपट महोत्सवात सहभागी करुन घेतले जाणार आहे. तर, सिनेरसिकांना महोत्सवादरम्यान प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांची माहिती सप्टेंबर मध्येच मिळेल यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.

माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांना इफ्फीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात आदरांजली वाहण्यात येईल. त्यांच्याच प्रयत्नामुळे गोवा इफ्फीचे कायमस्वरुपी केंद्र बनल्याचे प्रकाश जावडेकर म्हणाले.

इफ्फीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर आणि मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांच्या हस्ते विशेष पोस्टरचे अनावरण करण्यात आले. सुवर्णमहोत्सवी वर्ष संस्मरणीय ठरावे यासाठी राज्य सरकार पूर्ण प्रयत्न करत असल्याचे याप्रसंगी मुख्यमंत्री म्हणाले.

Exit mobile version