देशात वेगवेगळ्या ३० गटांकडून कोरोना वर लस शोधण्याचे प्रयत्न सुरू
Ekach Dheya
नवी दिल्ली : देशातील अनेक मोठ्या उद्योगांपासून ते स्वतंत्र शैक्षणिक संस्था असे जवळजवळ ३० गट कोविड-१९ प्रतिबंधात्मक लसीचा विकास करण्याचा प्रयत्न करत आहेत, असं भारत सरकारचे मुख्य विज्ञान सल्लागार डॉक्टर के विजय राघवन यांनी आज सांगितलं.
नवी दिल्ली इथं प्रसारमाध्यमांना माहिती देताना ते बोलत होते. त्यांनी सांगितलं की यातील वीस वेगवेगळे गट लसी शोधण्याबाबतीत वेगाने प्रगती करत आहेत. तसंच वेगवेगळ्या भारतीय संशोधन संस्था या विषाणूच्या चार वेगवेगळ्या प्रकारच्या लसी तयार करण्यामध्ये गुंतलेल्या आहेत. नवीन लसी शोधणे हे खूप आव्हानात्मक आहे.तरी ए आय सी टी ई आणि सी एस आय आर यांनी यासंदर्भात संशोधन सुरू केले आहे.
यावेळी बोलताना नीती आयोगाचे सदस्य डॉक्टर व्ही के पॉल यांनी सांगितलं की कोरोना विरुद्धचा लढा लस आणि औषधांद्वारे जिंकला जाईल. ते म्हणाले की देशातील विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्था आणि वैद्यकीय उद्योग चांगलं कार्य करत असून सुमारे वीस कंपन्या देशाला PPE किटस चा पुरवठा करतायेत.