Site icon साप्ताहिक एकच ध्येय

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर ‘विकास दर्शक’ डॅश बोर्डचे सादरीकरण

मुंबई : शासनाच्या सर्व योजनांचा एकाच वेळी आढावा घेता येणारे मुख्यमंत्री डॅशबोर्ड ‘विकास दर्शक’ या वेब आधारित डॅश बोर्डचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांच्या समोर सादरीकरण झाले. या डॅशबोर्ड मुळे लोकाभिमुख योजनांची प्रभावी अंमलबजावणी होण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर  कामकाजात अधिक पारदर्शकता येऊन प्रशासनाची विश्वासार्हता वाढणार आहे. या डॅशबोर्डमुळे राज्यात डेटा संचालित प्रशासन (data driven governance) आणि प्रत्यक्ष वेळेत प्रशासन (Real Time Governance) याकडे हे महत्वाचे पाऊल ठरले आहे.

या डॅशबोर्डचा उपयोग प्रत्येक विभागातील सचिवांना करता येणार आहे. या डॅशबोर्डचा आढावा मुख्यमंत्री स्वतः वेळोवेळी घेणार आहेत.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या संकल्पनेतून तयार झालेल्या या डॅश बोर्डसंबधी विस्तृत माहिती, माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी सादरीकरणातून दिली. ॲमेझॉन वेब सर्विसेसच्या क्लाऊडवर हे डॅशबोर्ड होस्ट केले असून याचे सनियंत्रण माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या ‘महा-आयटी’ या संस्थेमार्फत होणार आहे. ‘विकास दर्शक’ या मुख्यमंत्री डॅशबोर्डवर मुख्यमंत्र्यांना एकाच वेळी सर्व विभागांची एकत्रित आणि सर्वंकष माहिती बघता येणार आहे. एखाद्या योजनेचा आलेख कसा आहे याचा तालुकानिहाय आढावा आता एका क्लिकवर  घेता येणार आहे, तसेच प्रथमदर्शनी निदर्शनास येणाऱ्या प्रमुख अडचणींचेही तात्काळ निरसन करता येणे शक्य होणार आहे. प्रधानमंत्री आवास योजना, जलयुक्त शिवार योजना, मध्यान्ह भोजन योजना, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना या योजनांच्या प्रगतीचा आणि सद्य स्थितीचा आढावा घेता येणार आहे.

राज्यात ई-गव्हर्नन्सला चालना देण्यासाठी या डॅशबोर्डमुळे मदत होणार आहे. राज्यात उपलब्ध असलेल्या माहितीचे एकत्रिकरण करून वेगवेगळ्या विभागाच्या योजनांच्या अंमलबजावणीचा अभ्यास करून त्याचे अभ्यासपूर्ण विवेचन करणारे हे डॅशबोर्ड आहे. सध्या  २० विभागांच्या ३७ योजनांचा यात समावेश आहे. सुमारे ५० पेक्षा अधिक विभाग आणि योजनांचा आणि २५० माहिती स्त्रोतांचा अभ्यास करून ‘विकास दर्शक’ हे मुख्यमंत्री डॅशबोर्ड तयार झाले आहे. यात सुमारे ४० हुन अधिक माहिती स्त्रोत जोडले आहेत. या डॅशबोर्डला आकार देण्यासाठी यात येणारे विविध घटकांसमवेत सुमारे ३०० पेक्षा अधिक बैठका घेण्यात आल्या.

सामान्य नागरिकांनाही मुख्यमंत्र्यांच्या महत्वाच्या बातम्या असलेल्या ट्विटर, फेसबुक खाते आणि इतर  माहिती या डॅशबोर्डवर पाहता येणार आहे. त्याच प्रमाणे नागरिकांना आपला प्रतिसाद नोंदविता येणार आहे. योजनेसंबधी माहिती व इतर काही माहिती हवी असल्यास  चॅटबोट या अप्लिकेशनद्वारे प्रत्यक्ष प्रश्नही विचारता येणार आहेत. विभागाच्या उत्कृष्ठ कामकाजासाठी तसेच योजनेच्या उपयुक्ततेसाठी ‘स्टार रेटींग’ मिळणार आहे. यामुळे विभागांमध्ये सकारात्मक स्पर्धेचे वातावरण तयार होऊन नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा मिळणार आहेत.

https;//cmdashboard.maharashtra.gov.in या वेबसाईटवरुन अधिक माहिती घेता येणार आहे.

Exit mobile version