Site icon साप्ताहिक एकच ध्येय

सुक्ष्म नियोजन करून मृत्यू दर कमी करण्यावर लक्ष केंद्रित करावे – उप मुख्यमंत्री अजित पवार

पुणे : महापालिका व जिल्हा प्रशासनाने सुक्ष्म नियोजन करून मृत्यू दर कमी करण्यावर लक्ष केंद्रित करावे,असे आवाहन उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

कोरोनाला नियंत्रित करण्यासाठी शासकीय यंत्रणेद्वारे केल्या जाणाऱ्या उपाययोजनाबाबत लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांची बैठक आज विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते.

बैठकीला कृषी राज्य मंत्री विश्वजित कदम, महापौर मुरलीधर मोहोळ, आ. अशोक पवार, आ. संजय जगताप, आ. अतुल बेनके, आ. राहूल कुल, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजीत शिवतरे, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, संदीप बिष्णोई, जमाबंदी आयुक्‍त एस. चोक्‍कलिंगम, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, पीएमआरडीए चे आयुक्त विक्रमकुमार, सहकार आयुक्त अनिल कवडे, साखर आयुक्त सौरभ राव, पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग, भूजल सर्व्हेक्षण संचालक कौस्तुभ दिवेगावकर, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, ससूनचे अधिष्‍ठाता डॉ. मुरलीधर तांबे, आरोग्य विभागाचे निवृत्त महासंचालक डॉ. सुभाष साळुंखे आदींसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

उपस्थित लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांचे म्हणणे व सूचना ऐकून घेतल्यानंतर उप मुख्यमंत्री श्री.पवार पुढे म्हणाले, लोकांमध्ये जनजागृती व त्यांच्यात विश्वास निर्माण करणे आवश्यक आहे.ग्रामीण भागातील लोकांमध्ये गैरसमज निर्माण होऊ शकते. त्यामुळे कोरोनाबरोबर जगताना घ्यावयाच्या काळजीबाबत लोकांना समजावून सांगणे आवश्यक आहे.

महापालिकेने बालेवाडीत बेडची व्यवस्था केली आहे.पण ग्रामीण भागातही तशी व्यवस्था उभी करावी लागेल. शेवटी माणसांचे जीव वाचविणे महत्त्वाचे आहे.

लाॅकडाऊनच्या अनुषंगाने बोलताना उप मुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले, त्या-त्या भागातील भौगोलिक परिस्थिती बघून निर्णय घ्यावे लागेल.

खाजगी दवाखान्याचे ८० टक्के बेड ताब्यात घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. बी.जे.मेडिकल काॅलेज ससून हाॅस्पिटलच्या नवीन ११ मजली इमारतीचे सर्व मजले उपयोगात आणले पाहिजे. निधीची अजिबात कमतरता भासू देणार नाही.मागणी केल्यास निधी उपलब्ध करून देऊ,असेही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ग्रामीण भागात लक्ष केंद्रित करावे. रुग्णालय सक्षम करावे. पोलिस यंत्रणा व लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन काम करावे, असे सांगितले.

ग्रामीण भागात डाॅक्टरांनी निवासी थांबले पाहिजे,या राज्यमंत्री डाॅ.कदम यांच्या सूचनेवर उपमुख्यमंत्री यांनी काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

Exit mobile version