Site icon साप्ताहिक एकच ध्येय

देशात एकाच दिवशी ८ हजारापेक्षा जास्त कोरोनाबाधित

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आज सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत कोरोना संसर्ग झालेले ८ हजार ३८० नवे रुग्ण आढळले तर १९३ रुग्णांचा मृत्यू झाला. कोविड-१९ मधून बरे होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण वाढत असून त्याचा दर आता ४७ पूर्णांक ७५ शतांश टक्के झाला आहे.

नोवेल कोरोनाची लागण झालेल्या एकूण १ लाख ८२ हजार १४३ रुग्णांपैकी ८६ हजार ९८३ जण बरे झाले आहेत. सध्या उपचार घेणाऱ्यांची संख्या ८९ हजार ९९५ झाली आहे. देशात आतापर्यंत ५ हजार १६४ रुग्णांचा कोविट-१९ ने मृत्यू झाला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही आकडेवारी दिली आहे. राज्यात काल दिवसभरात कोरोना विषाणूची बाधा झालेल्या ९९ रुग्णांचा मृत्यू झाला तर २ हजार ९४० नवे रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या ६५ हजार १६८ झाली आहे.

राज्यात काल १ हजार ८४ रुग्ण कोरोना विषाणू संसर्गातून बरे झाल्यानं, त्यांना रुग्णालयांमधून सुटी देण्यात आली. आता राज्यात आतापर्यंत बरे होऊन घरी परतलेल्या रुग्णांची एकूण संख्या २८ हजार ८१ झाली आहे. आतापर्यंत २ हजार १९७ जण या साथीत दगावले आहेत.

मुंबईत कोरोना संसर्गाचे केंद्रबिंदू राहिलेल्या भागात रुग्णांची संख्या अद्याप आटोक्यात आली नसून भायखळा, वरळी,  दादर, धारावी, चेंबूर, अंधेरी , कुर्ला या  उपनगरांमध्ये कोरोना पॉसिटीव्ह रुग्णांची संख्या ३ हजारावर पोहोचली आहे. महानगरपालिकेच्या या ७ प्रभागांमध्ये दाटीवाटीची लोकवस्ती असून कोरोनाचं संक्रमण रोखण्यासाठी  या भागावर महालिकेनं लक्ष केंद्रित केलं आहे.

धारावीत कोरोना पॉसिटीव्ह रुग्णांची एकूण  संख्या १ हजार ७३३ वर पोहोचली असून, ७१ जणांचा मृत्यू झाला. ठाणे जिल्ह्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या ९ हजार १२३ वर गेली  आहे.  जिल्ह्यात काल १६ रुग्णांचा मृत्यू झाल्यानं एकूण  मृतांची संख्या २३९ इतकी झाली.

ठाणे महापालिका क्षेत्रात काल कोरोनाचे १५१ नवे रुग्ण आढळून आल्यानं महापालिका क्षेत्रात एकूण रुग्णसंख्या २ हजार ९०१ झाली आहे, तर मृतांचा आकडा ८४ वर पोहोचला. ठाणे ग्रामीणमध्ये १६ नवे कोरोना पॉसिटीव्ह रुग्ण आढळून आल्यानं  एकूण रुग्णांचा आकडा ३४३ वर गेला आहे.

कल्याण डोंबिवलीत काल 38 नव्या रुग्णांची नोंद झाली असून  एकूण रुग्णांचा आकडा ९८० वर गेला आहे, तर  मृतांची संख्या २८ झाली. आहे. उल्हासनगरमध्ये कोरोनाचे ३० नवीन रुग्ण आढळल्यानं एकूण रुग्णांची संख्या ३३५ झाली आहे.

मिराभाईंदरमध्ये १८ रुग्ण कोरोना पॉसिटीव्ह आढळून आल्यानं एकूण रुग्ण संख्या ६४९, तर मृतांचा आकडा २४ झाला आहे. अंबरनाथ मध्ये कोरोनाचे १७ नवे  रुग्ण आढळून आल्यानं  एकूण रुग्ण संख्या १३१ झाली आहे.

भिवंडीमध्ये ७ नवे कोरोना पॉसिटीव्ह रुग्ण आढळून आल्यानं कोरोना बाधितांची एकूण संख्या ११९ झाली आहे, तर बदलापूरमध्ये ७ नवे रुग्ण आढळून आल्यानं रुग्णांची एकूण संख्या २१३ झाली.

औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत आज सकाळी ४२ रुग्णांची वाढ झाली. त्यामुळे एकूण कोरोनाबाधितांची संख्या १ हजार ५४० झाली आहे. यापैकी नऊशे शहात्तर कोरोनाबधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, ७० जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानं आता चारशे चौऱ्याण्णव रुग्णांवर उपचार सुरू असल्याचं प्रशासनानं कळवलं आहे.

सातारा जिल्ह्यात  काल ३२ नवे कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले असून जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची एकूण संख्या ५१६ झाली आहे. आतापर्यंत १५८ रुग्ण उपचारानंतर  बरे झाले, ३३९ रुग्ण उपचार घेत आहेत तर एक जण मृत्युमुखी पडला.

दरम्यान महाबळेश्वरमध्ये  MTDC  विलगीकरण केंद्रात एका रुग्णानं  काल गळफास लावून आत्महत्या केली. जालना जिल्ह्यात परतूर तालुक्यातल्या  एका मृत व्यक्तीचा कोरोना चाचणी अहवाल आज पॉसिटीव्ह आला. ही व्यक्ती  न्यूमोनिया या आजारावर जिल्हा रुग्णालयात  उपचार घेत होती. जिल्ह्यातला कोरोनाचा हा पहिला मृत्यू आहे.

परभणी जिल्ह्यात ६ नवे कोरोना पॉसिटीव्ह रुग्ण आढळून आले असून जिल्ह्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या ८० झाली आहे.

अहमदनगर जिल्ह्यात आज १४ व्यक्तींचे कोरोना चाचणी अहवाल पॉसिटीव्ह आली असून जिल्ह्यात कोरोना बाधितांचा एकूण आकडा १३१ वर पोहोचला आहे, तर ६८ जण बरे होऊन घरी गेले.

उस्मानाबाद जिल्ह्यात आज ७ नवे कोरोना बाधित  रुग्ण आढळून आले असून जिल्ह्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या ७१ झाली आहे. १८ जण बरे होऊन घरी गेले, २ जणांचा मृत्यू झाला तर ५१ रुग्ण उपचार घेत आहेत.

रायगड जिल्ह्यात आज ४२ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉसिटीव्ह आला असून कोरोना बाधितांची एकूण संख्या १ हजार ५० झाली आहे. जिल्ह्यात एकूण ५८९ रुग्ण उपचारानंतर बरे झाले तर ४१४ जण  उपचार घेत आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यात काल ४७ नवे कोरोना बाधित आढळून आली असून जिल्ह्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या २५६ झाली आहे. २३० जण उपचार घेत असून आतापर्यंत ९८ रुग्ण बरे झाले, तर ६ जण मृत्युमुखी पडले.

नांदेड जिल्ह्यात आज २ जण कोरोना पॉसिटीव्ह आढळून आले असून हे दोन्ही रुग्ण मुंबईहून आले आहेत. जिल्ह्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या १४६ झाली आहे, १०३ रुग्ण बरे होऊन घरी गेले, तर  सध्या ३५ जण उपचार घेत आहेत.

Exit mobile version