महाराष्ट्रात विशेषतः बृहन्मुंबई महानगरपालिकेत डॉक्टर, नर्सेस यांच्या सेवा मानधन तत्वावर घ्या
Ekach Dheya
वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांचे निर्देश
लातूर : बृहन्मुंबईतील कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करण्यासाठी डॉक्टर आणि नर्सेस यांची आवश्यकता असल्याने त्यांची सेवा मानधन तत्वावर कोविड कालावधीसाठी घेण्यात यावी, असे निर्देश वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी आज दिले.
जे डॉक्टर 45 वर्षापेक्षा कमी आहेत आणि ज्यांना कुठलाही आजार नाही आणि ज्यांनी त्यांची इंटर्नशिप पूर्ण केली आहे आणि ज्यांच्याकडे रजिस्ट्रेशन आहे, अशा डॉक्टरांना मानधन तत्त्वावर कोविड कालावधीसाठी गरजेनुसार घेण्यात येणार आहे. या डॉक्टरांना दरमहा 80 हजार रुपये मानधन दिले जाईल. डॉक्टरांप्रमाणे फिजिशियन यांनाही मानधन तत्वावर घेण्यात येणार आहे. भूलतज्ञ आणि इंटेन्सिविस्ट यांना दरमहा दोन लाख रुपये मानधन देण्यात येणार आहे.
बृहन्मुंबईतील नर्सेसची कमतरता भरून काढण्यासाठी त्यांनाही मानधन तत्वावर घेण्यात येणार आहे. ज्यांनी बी.एसस्सी. किंवा जी.एन.एम. नर्सिंग कोर्स पूर्ण केला आहे आणि ज्यांच्याकडे रजिस्ट्रेशन आहे, त्यांना दरमहा 30 हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे. डॉक्टर आणि नर्सेस यांना हे मानधन बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत देण्यात येणार आहे. पात्र डॉक्टरांनी https://forms.gle/PtCY3SvhvEA43WxV6 या गुगल सीटवर तसेच पात्र नर्सेस यांनी https://forms.gle/81LcWWajq1WNQ6cK8 या गुगल सीटवर अर्ज करावेत, असे आवाहनही वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी केले आहे.