राज्यात शैक्षणिक वर्ष जूनपासूनच सुरू होणार, मुख्यमंत्र्यांचे संकेत
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुलांसाठी शिक्षण अत्यंत महत्वाचं असून, नवीन शैक्षणिक वर्ष जूनमध्येच सुरु व्हायला हवं असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितलं. कोरोना विषाणूचा फैलाव न झालेल्या राज्याच्या दुर्गम भागातल्या ज्या शाळांमध्ये इंटरनेटची सुविधा नाही, त्या शाळा सुरक्षित सामाजिक अंतर राखण्याचा संकेत पळून उघडता येतील असंही ते म्हणाले.
आज व्हिडीओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून राज्यातल्या शालेय शिक्षण अधिकाऱ्यांशी ते बोलत होते. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यावेळी उपस्थित होत्या.
कोरोनाचा प्रादुर्भाव असलेल्या भागातल्या शाळांमध्ये ऑनलाईन शिक्षणपद्धतीचा वापर व्हायला हवा. यासाठी राज्यात ऑनलाईन शिक्षणपद्धती अधिक विकसित व्हायला हवी असं ते म्हणाले.
ज्या शाळांचा वापर सध्या कोरोनाच्या रुग्णांना विलगीकरणात ठेवण्यासाठी केला जात आहे, त्या शाळा विद्यार्थ्यांसाठी खुल्या करण्यापूर्वी त्याचा परिसर निर्जंतुक करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.