महाराष्ट्रात, गुजरातमध्ये चक्रीवादळ येण्याची शक्यता
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून त्याचं रूपांतर चक्री वादळामध्ये होऊन, येत्या ३ जूनपर्यंत ते महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारपट्टीकडे सरकेल, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
यामुळे समुद्र खबळलेला राहणार असून मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये तसेच समुद्रात गेलेल्या मच्छिमारांनी परत यावे असे आवाहन सिंधुदुर्गच्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने केलं आहे. गेल्या चोवीस तासांत औरंगाबाद, जालना, लातूर, हिंगोली, सिंधुदुर्गासह कोकणात आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला.
राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान काल वर्धा इथं ४३ अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. येत्या दोन दिवसांत संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.