मुंबई (वृत्तसंस्था) : कच्च्या घरात राहणाऱ्या लोकांना चक्रीवादळामुळे पक्क्या वास्तूंमध्ये स्थलांतरित करण्यात येत आहे. मुंबई कमी उंचीवर असलेल्या भागातील आणि झोपडीत राहणाऱ्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविले जात आहे.
चक्रीवादळामुळे पालघर जिल्ह्यातल्या वसई, पालघर, डहाणू आणि तलासरी या ४ तालुक्यातली समुद्र काठालगत वसलेल्या जवळपास २२ गावांना या निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आणि या २२ गावांना निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसल्यास अंदाजे जवळपास २१०८० इतकी लोकसंख्या बाधित होऊ शकेल.
यात वसई तालुक्यातल्या किनाऱ्यालगत असलेल्या पाचूबंदर(वसई), चांदीप, सायवन, कामण, ससूनवघर, अर्नाळा, अर्नाळा किल्ला, रानगाव, सत्पाळा, कळंब, राजोडी, भुईगावं बुद्रुक अशा १२ गावांना ह्या चक्रीवादळाचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जातेय. बाधित होणाऱ्या या १२ गावांची अंदाजे लोकसंख्या ही १२५२० इतकी असल्याचं प्रशासनाकडून सांगितलं जातं आहे.
तर पालघर तालुक्यातल्या किनाऱ्यालगत असलेल्या सातपाटी, जलसारंग, उच्छेळी, मुरबे आणि दांडी अशा ५ गावांना देखील या चक्रीवादळा तडाखा बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बाधित होणाऱ्या या ५ गावांची अंदाजे लोकसंख्या ही ७००० इतकी असल्याची माहिती प्रशासना कडून देण्यात आली आहे.
तसंच डहाणू तालुक्यातल्या किनाऱ्या लगत असलेल्या डहाणू , नरपड, चिखले आणि आंबेवाडी अशा ४ गावांना निसर्ग चक्रीवादळा चा फटका बसण्याची शक्यता असून या ४ गावांची लोकसंख्या अंदाजे १४०० आल्याचं सांगण्यात येतय.
तलासरी तालुक्यातल्या समुद्र किनाऱ्यालगत असलेल्या झाई या १ गावाला चक्रीवादळा चा तडाखा बसण्याची शक्यता असून इथली अंदाजे लोकसंख्या ही १६० इतकी असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
निसर्ग चक्रीवादळाच्या देण्यात आलेल्या इशाऱ्यानुसार पालघर जिल्ह्यातल्या समुद्रकाठी असलेल्या चक्रीवादळामुळे बाधीत होणाऱ्या गावांमधल्या बाधीत नागरिकांचं स्थलांतरण निवारा छावण्यांमध्ये करण्यात येणार असल्याचं जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी सांगितलं आहे. निवारा छावनीत निवारा देण्यात आलेल्या नागरिकांना पिण्याचं पाणी, अन्न आणि आरोग्य सेवा तसंच औषधांचा योग्य पुरवठा करण्याची जबाबदारी जिल्ह्यातल्या सर्व गटविकास अधिकारी यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
या चक्रीवादळामुळे वसई, पालघर, डहाणू तालुक्यातले सर्व उद्योग, कार्यालय, दुकाने, खासगी कार्यालय बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. सर्व कारखान्यांनी रसायन आणि वायू उत्सर्जन होणार नाही याची काळजी घेण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.
रायगड जिल्ह्यात अलिबाग, पेण, मुरुड, तळा, म्हसळा, श्रीवर्धन आणि रोहा या तालुक्यात उद्या मध्यरात्रीपर्यंत नागरिकांना घराबाहेर पडायला बंदी घालण्यात आली आहे.
चक्रीवादळामुळे अधिक नुकसान होऊ नये यासाठी सर्व खबरदारी घेतली जाते आहे. वीजपुरवठा खंडित होऊ नये म्हणून सर्व प्रयत्न केले जात आहेत. पालघर आणि रायगड जिल्ह्यात असलेल्या रासायनिक आणि अणूऊर्जा प्रकल्पांच्या सुरक्षेचीही पुरेशी काळजी घेण्यात आलेली आहे.
या चक्रीवादळामुळे सर्व मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आलेला आहे.समुद्रात गेलेल्या मच्छिमारांना परत आणण्याची जबाबदारी तटरक्षक दलावर सोपविण्यात आली आहे. जीवितहानी होणार नाही याची खबरदारी घेण्याच्या सूचना सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.