पर्यावरण विभागाचे नाव ‘पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग’ असे करणे प्रस्तावित
Ekach Dheya
मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर होणार बदल
निसर्गाशी संबंधित पृथ्वी, वायू, जल, अग्नी, आणि आकाश या पंचतत्वांवर विभाग कार्य करणार
पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आणि राज्यमंत्री संजय बनसोडे यांची जागतिक पर्यावरण दिनी घोषणा
मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण विभागाचे नाव आता ‘पर्यावरण व वातावरणीय बदल’ विभाग असे करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. लवकरच मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर हा बदल करण्यात येईल. तसेच पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग हा निसर्गाशी संबंधित पृथ्वी, वायू, जल, अग्नी, आणि आकाश या पंचतत्वांवर कार्य करेल, अशी घोषणा राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आणि राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी आज जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून केली.
विभागातील नावाच्या बदलासह विभागाचे ध्येय व उद्दिष्टे अधिक व्यापक करत त्यात सध्याच्या वातावरणातील बदल व त्या अनुषंगाने तातडीने करावयाच्या उपाययोजनांचा अंतर्भाव करण्यात आल्याची माहिती मंत्री श्री. ठाकरे व राज्यमंत्री श्री. बनसोडे यांनी दिली. युनायटेड नेशन्स एनव्हायरमेंट प्रोग्रामने (UNEP) “जागतिक पर्यावरण दिन २०२०” ची संकल्पना “Time For Nature” अशी निश्चित केली असून त्या अनुषंगाने विभागाने राज्य शासनाच्या इतर संबंधित विभागांसह वातावरणीय बदलांबाबत उपाययोजना करत निसर्गपूरक जीवनपध्दतीसाठी कृती आराखडे तयार केले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
राज्य शासनाची निसर्गाशी असलेली कटिबद्धता निश्चित करण्यासाठी यावर्षी या विभागामार्फत १०० कोटी रुपये इतका निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, असेही मंत्री श्री. ठाकरे व राज्यमंत्री श्री. बनसोडे यांनी जाहीर केले.
पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग हा निसर्गाशी संबंधित पृथ्वी, वायू, जल, अग्नी, आणि आकाश पंचतत्वांवर कार्य करेल. पृथ्वी तत्वाशी संबंधित वनीकरण, वनसंवर्धन, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन व जमिनीचे धुपीकरण इत्यादी बाबींवर हा विभाग कार्य करेल. तसेच हवेच्या गुणवत्तेसाठी हा विभाग उद्योग, परिवहन व इतर विभागांना सहकार्य करुन वायूप्रदूषण कमी करुन महाराष्ट्रातील हवेची गुणवत्ता सुधारेल व वायूतत्वाचे संरक्षण करेल. तसेच जल तत्वाशी संबंधित नदी संवर्धनाच्या सद्य:स्थितील चालू कामांसह सागरी जैव विविधता, जलस्त्रोतांचे संवर्धन व संरक्षण तसेच सागरी किनारे यांची स्वच्छता यांचा अंतर्भाव करण्यात आला आहे. अग्नी तत्वाशी संबंधित उर्जा स्त्रोत म्हणून अन्य विभागांसह कार्य करीत ऊर्जेचा परिणामकारक वापर, ऊर्जा बचत तसेच ऊर्जेचा अपव्यय टाळणे या बाबींना प्रोत्साहन देत, अपारंपरिक ऊर्जेच्या निर्मितीसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम, महामार्गाच्या दुतर्फा असलेल्या जागा, पडिक जमिनी, शेतांचे बांध या सारख्या जागांवर राबविल. आकाशाच्या विविध संकल्पनांपैकी हा विभाग आकाश या तत्वास स्थळ व प्रकाश या स्वरुपात निश्चित करुन मानवी स्वभावातील बदलांसाठी जनजागृती व शैक्षणिक कार्यक्रमांद्वारे जनमानसात आपल्या कृतीद्वारे आपला भवताल अधिक समृद्ध करण्यासाठी प्रवृत्त करेल.
निसर्गाच्या पंचतत्वासंगत जीवन पद्धती अंगिकारल्याशिवाय आपण निसर्गासोबत जगू शकणार नाही आणि जैव विविधतेचेही अस्तित्व राहणार नाही. जागतिक पर्यावरण दिनाचे सर्व कार्यक्रम आपण करीत नसलो तरी सद्य:स्थितीत हीच निसर्गास वेळ देण्याची “Time For Nature” ची आहे. यासाठी राज्यातील इतर विभाग, इतर राज्ये, केंद्र, अशासकीय संस्था, पर्यावरणवादी आणि राज्यातील प्रत्येक नागरिक यांसह एकत्रितपणे कार्य करण्याची आमची इच्छा आहे. आपल्यापासूनच बदल सुरु होतो, असे आवाहनही मंत्री श्री. ठाकरे व राज्यमंत्री श्री. बनसोडे यांनी केले आहे.