Site icon साप्ताहिक एकच ध्येय

देशातले १ लाख १४ हजाराहून अधिक तर राज्यातले ३५ हजारांपेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविडग्रस्तांची एकूण संख्या दोन लाख 36 हजार 657 झाली आहे, यापैकी आतापर्यंत 1 लाख 14 हजार 72 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.  सध्या एक लाख 15 हजार 942 रुग्ण उपचार घेत आहेत. कालच्या एका दिवसात कोरोनाची लागण झालेले 9 हजार 887 रुग्ण आढळले तर 294 रुग्णांचा मृत्यू झाला. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज ही आकडेवारी जाहीर केली. देशात आतापर्यंत 6 हजार 642 जणांचा मृत्यू या आजाराने झाला आहे.  कोविड 19च्या फैलावाबाबत आता भारत जगात सहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे. कोरोना विषाणूग्रस्तांचं बरे होण्याचं प्रमाण 48 पूर्णांक 20 शतांश टक्के एवढं झालं आहे.

राज्यात काल १ हजार ४७५ रुग्णांना घरी सोडण्यात आलं असून आतापर्यंत घरी सोडण्यात आलेल्या कोरोनाग्रस्त रुग्णांची एकूण संख्या ३५ हजार १५६ झाली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली.  कोरोनाच्या २ हजार ४३६ नवीन रुग्णांची काल राज्यात भर पडली असून एकूण संख्या ८० हजार २२९ झाली आहे. सध्या राज्यात ४२ हजार २१५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात काल १३९ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली, या पैकी २७ मृत्यू हे मागील दोन दिवसांतले आहेत, तर उर्वरित मृत्यू  २१ एप्रिल ते २ जून या कालावधीतले आहेत. राज्यातल्या कोरोनाबाधितांच्या मृत्यूंची संख्या आता २ हजार ८४९ इतकी झाली आहे.

सध्या राज्यात ४६ शासकीय आणि ३७ खाजगी, अशा एकूण ८३ प्रयोगशाळा कार्यरत आहेत. आजपर्यंत  ५ लाख २२ हजार ९४६ नमुन्यांची चाचणी झाली असून, चाचण्यांचं प्रमाण, दहा लाखात ३ हजार ८२७ एवढं आहे. देशपातळीवर हेच प्रमाण २ हजार ८३२ इतकं आहे.

राज्यात ५ लाख ४५ हजार ९४७ जण गृह विलगीकरणात असून, ३० हजार २९१ जण सध्या संस्थात्मक विलगीकरणात आहेत. संस्थात्मक विलगीकरणासाठी सध्या ७२ हजार ३७५ खाटा, राज्यात उपलब्ध आहेत.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज तीन, तर कालच्या दिवसभरात कुडाळ आणि कणकवली तालुक्यात प्रत्येकी ३ अशा ६ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे जिल्ह्यातल्या कोरोनाबाधितांची संख्या ११६वर पोचली आहे. यापैकी १६ जण कोरोनामुक्त झाले आहेत. गेल्या काही दिवसात जिल्ह्यातल्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वेगानं वाढल्यानं जिल्ह्यात ५३ ठिकाणं प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केली आहेत.

अमरावती जिल्ह्यात काल ११ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले त्यामुळे जिल्ह्यातल्या कोरोनाबाधितांची संख्या २७० झाली आहे. यापैकी १६६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत तर आत्तापर्यंत १६ जणांचा या आजारानं मृत्यू झाला आहे.

सांगलीत काल नव्या १५ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. जिल्ह्यातल्या एकूण कोरोनाबाधितांपैकी ८१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, तर सध्या ५८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

नाशिक जिल्ह्यात काल ३६ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. यापैकी २१ रुग्ण नाशिक शहरातले आहेत, तर १५ जण  मालेगांव, मनमाड, येवला आणि निफाड तालुक्यातले आहेत. यामुळे जिल्ह्यातल्या एकूण कोरोनाबाधितांची संख्या १ हजार ४५१ झाली आहे, त्यापैकी ९७३ जण कोरोनामुक्त झाल्यानं त्यांना रुग्णालयातून घरी सोडलं आहे. दरम्यान नाशिक जिल्ह्यात काल मृत्यूपश्चात कोविड चाचणी केलेल्या १० जणांचे अहवाल पॉझीटीव्ह आल्यानं जिल्ह्यातल्या कोरोनामुळे मरण पावलेल्यांची संख्या ८९ झाली आहे. यात मालेगावमधल्या ८ तर, येवला आणि नाशिक शहरातल्या प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

वर्धा जिल्ह्यात काल एक नवा कोरोनाबाधित रुग्ण आढळला. हा रुग्ण दिल्लीहून त्याच्या गावी आला होता. दरम्यान जिल्ह्यातल्या एकूण २० कोरोनाबाधित रुग्णांपैकी १६ जण कोरोनामुक्त झाले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य प्रशासनानं दिली आहे.

सातारा जिल्ह्यात काल रात्री उशीरा एकोणीस जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझीटीव्ह आले. तर एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

अकोला जिल्ह्यातल्या एकूण कोरोनाबाधितांपैकी ७१ पूर्णांक ६६ दशांश टक्के रुग्ण कोरोनामुक्त झाले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली आहे. तिथे आत्तापर्यंत आढलेल्या ७४६ कोरोनाबाधितांपैकी ५०५ रुग्ण कोरोनामुक्त झाले असल्याचं प्रशासनं कळवलं आहे.

जालन्यात आणखी अकरा नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे जिल्ह्यातल्या कोरोनाबाधितांची संख्या १८५ झाली आहे. जिल्ह्यात आज एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यूही झाला. त्यामुळे जिल्ह्यात या आजारानं दगावलेल्यांची संख्या ४ झाली आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात आज ९० कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यात हर्सुल कारागृहातल्या एकोणतीस रुग्णांचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यातली एकूण कोरोनाबाधितांची संख्या १ हजार ९३६ झाली आहे. यापैकी १ हजार १५४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

Exit mobile version