Site icon साप्ताहिक एकच ध्येय

लॉकडाऊन काळात सायबरचे ४५८ गुन्हे दाखल

२५० लोकांना अटक; सातारा येथे नवीन गुन्हा

मुंबई : लॉकडाऊन काळात राज्यामध्ये काही गुन्हेगार व समाजकंटक गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सायबर विभागाने कठोर पाऊले उचलली आहेत. राज्यात सायबर संदर्भात ४५८ गुन्हे दाखल झाले असून २५० व्यक्तींना अटक केली आहे, अशी माहिती महाराष्ट्र सायबर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी दिली.

महाराष्ट्र राज्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये मध्ये एकूण ४५८ गुन्ह्यांची (ज्यापैकी २७ N.C आहेत) नोंद ०५ जून २०२० पर्यंत झाली आहे.

या सर्व गुन्ह्यांचे महाराष्ट्र सायबरने जेव्हा विश्लेषण केले तेव्हा असे निदर्शनास आले की आक्षेपार्ह व्हाट्सॲप मेसेजेस फॉरवर्ड केल्या प्रकरणी १९० गुन्हे दाखल झाले आहेत तर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट्स शेअर केल्या प्रकरणी १८४ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. tiktok विडिओ शेअर प्रकरणी २३ गुन्हे दाखल झाले आहेत व ट्विटरद्वारे आक्षेपार्ह ट्विट केल्या प्रकरणी ८ गुन्हे दाखल झाले आहेत. इन्स्टाग्रामवरून चुकीच्या पोस्ट टाकल्याप्रकरणी ४ गुन्हे दाखल झाले आहेत. अन्य सोशल मीडियाचा (ऑडिओ क्लिप्स, youtube) गैरवापर केल्या प्रकरणी ४९ गुन्हे दाखल झाले आहेत व त्यामध्ये आतापर्यंत २५० आरोपींना अटक केली आहे. तर यापैकी १०७ आक्षेपार्ह पोस्ट्स takedown करण्यात यश आले आहे.

सातारा

सातारा जिल्ह्यातील  फलटण पोलीस ठाण्यामध्ये एका गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे त्यामुळे जिल्ह्यात नोंद झालेल्या गुन्ह्यांची संख्या १४ वर गेली आहे. सदर गुन्ह्यातील आरोपीने आपल्या फेसबुक प्रोफाईलवर कोरोनाग्रस्त रुग्णांची चुकीची माहिती असणारी पोस्ट शेअर करून अफवा पसरविली होती त्यामुळे परिसरातील लोकांमध्ये भीती व संभ्रम निर्माण झाला होता.

चुकीची माहिती, मेसेजेस व पोस्ट्स पासून सावध

सध्या लॉकडाऊन काळात कोरोना महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेकजण वेगळे उपचार आपल्या भारतीय इतिहासात सांगितले आहेत अशी चुकीची माहिती असणारे मेसेजेस व पोस्ट्स फेसबुक व्हाट्सॲप इत्यादी सोशल मीडियावर फॉरवर्ड किंवा शेअर करत आहेत. महाराष्ट्र सायबर सर्व नागरिकांना विनंती करते की, कृपया कोणीही अशा मेसेज व पोस्टवर विश्वास ठेवून स्वतःवर किंवा आपल्या घरातील इतरांवर कोणतेही प्रयोग करू नका. तसेच अशा मेसेज मधील माहितीची खातरजमा तज्ज्ञ डॉक्टरांकडून करून घ्या. असे मेसेज फॉरवर्ड करू नये, कारण खोटी माहिती व अफवा पसरविणे कायद्याने गुन्हा आहे, असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागामार्फत करण्यात येत आहे.

Exit mobile version