‘निसर्ग’ चक्रीवादळात झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे प्रशासनाला आदेश
Ekach Dheya
बाधितांना जास्तीतजास्त मदत देणार – उपमुख्यमंत्री अजित पवार
पुणे : ‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे बाधित झालेल्या नागरिकांना लवकरात लवकर मदत देता यावी यासाठी नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. पुण्यासह राज्यातील सर्व बाधितांना जास्तीत जास्त मदत केली जाईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिला.
‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे पुणे जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित या बैठकीला कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, खासदार श्रीरंग बारणे, खासदार डॉ.अमोल कोल्हे, आमदार दिलीप मोहिते-पाटील, आमदार अशोक पवार, आमदार सुनील शेळके, आमदार अतुल बेनके, आमदार संग्राम थोपटे, आमदार सुनील टिंगरे आदी लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित लोकप्रतिनिधींनी केलेल्या सूचना ऐकून घेतल्या व मंत्रीमंडळ बैठकीत याबाबत योग्य निर्णय घेतला जाईल, असे सांगितले. पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा तात्काळ सुरू करणे, वीजेचे खांब उभे करणे, गरज भासल्यास दुसऱ्या जिल्ह्यातील मनुष्यबळाची मदत घेणे, आदिवासी-बिगर आदिवासी भागातील लोकांना तातडीने मदत देणे, घर, शाळा, अंगणवाडी दुरूस्तीची कामे तातडीने सुरू करणे, नुकसानीचे पंचनामे तात्काळ पूर्ण करून अहवाल सादर करणे आदी सूचना त्यांनी केल्या. दि. १३ मे २०१५ च्या शासन निर्णयानुसार देण्यात येणाऱ्या मदतीच्या रकमेत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
विभागीय आयुक्त डॉ.दिपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, कृषी आयुक्त सुहास दिवसे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, उपवन संरक्षक ए. श्रीलक्ष्मी, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब पलघडमल, सहायक जिल्हाधिकारी जीतेंद्र डुडी, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतापसिंह चव्हाण, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बनोटे तसेच विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आदिवासी भागातील बाळहिरड्याचे प्रचंड नुकसान झाल्याचे सांगितले. आदिवासी भागातील हे प्रमुख उत्पन्नाचे साधन आहे. बाळहिरड्याचे प्रति किलो २४० रूपये इतका भाव आहे. या आदिवासी भागातील शेतकऱ्यांना वेगळा मापदंड लावून नुकसान भरपाई देण्याचा विचार व्हावा. आदिवासी भागात घरांचेही मोठे नुकसान झाले, त्यासाठी तातडीने मदत व्हावी, असेही ते म्हणाले.
जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी संगणकीय सादरीकरण केले. निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यात आले आहेत. नजरअंदाज अहवालानुसार बाधित झालेल्या गावांची संख्या ३७१ असून शेतकऱ्यांची संख्या २८ हजार ४९६ आहे. एकूण बाधित क्षेत्र सुमारे ७ हजार ८७४ हेक्टर आहे. पॉलीहाऊस व शेडनेटचे नुकसान झाले असून हे १००.५३ हेक्टर इतके बाधित क्षेत्र आहे. ८७ गावातील ३१७ पॉलीहाऊस व शेडनेट चे नुकसान झाल्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले.