मोजक्या शिवभक्तांच्या उपस्थितीत रायगडावर ३४७वा शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्या शिवभक्तां च्या उपस्थितीत, रायगडावर आज ३४७ वा शिवराज्याभिषेक दिनाचा सोहळा, उत्साहात साजरा झाला.
राजसदरेवर महाराजांच्या उत्सव मूर्तीचं पूजन झाल्यानंतर मेघडंबरीतल्या शिवरायांच्या पुतळ्याला सुवर्ण नाण्यांचा अभिषेक घालण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय जिजाऊ जय शिवराय, जय भवानी, या जयघोषानं गड दणाणून गेला.
युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी शिवभक्तांना यावेळी मार्गदर्शन केलं. रायगड जिल्ह्याला कोरोना आणि निसर्ग वादळाचा मोठा फटका बसला असून मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यासाठी विशेष पॅकेज जाहीर करावंं, अशी मागणी करतानाच, रायगड परिसरातल्या २१ गावांसाठी सुसज्ज प्राथमिक आरोग्य केंद्र उभारलं जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
कोरोनामुळे सध्याची स्थिती बिकट झाली असून याला आव्हानात्मक स्थितीला तोंड देण्यासाठी प्रत्येकानं महाराजांचे विचार अंगिकारावं, असं आवाहनही संभाजीराजे यांनी यावेळी केलं. त्यानंतर होळीच्या माळावरून उत्सव मूर्ती जगदीश्व र मंदिराकडे नेण्यात आली. शिवसमाधीला अभिवादन झाल्यानंतर सोहळ्याची सांगता झाली.
दरम्यान, कोरोना संकटात विविध क्षेत्रातले कर्मचारी, महिला, युवक उल्लेखनीय सेवा देत आहेत. त्यांचा सन्मान म्हणून, रायगडावर बंदोबस्तासाठी असलेल्या २ पोलिसांचा, राजसदरेनं ‘कोरोना योद्धा’ प्रमाणपत्र प्रदान करून सत्कार केला, इतरांना हे प्रमाणपत्र ईमेलनं पाठवलं जाणार आहे
३४७ व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केलं आहे. शिवाजी महाराजांचा लोककल्याणकारी राज्य कारभार जगात आदर्श मानला जातो. त्यांनी दाखवलेल्या मार्गानं पुढे जाऊ या,असं मुख्यमंत्र्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात रयतेचं राज्य, हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. त्यांनी गाजवलेलं शौर्य, केलेला पराक्रम, राज्यकारभाराचा घालून दिलेला आदर्श, महाराष्ट्राला सदैव प्रेरणा देत, मार्गदर्शन करत राहील, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचं स्मरण करुन,त्यांना वंदन केलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही ट्विटर संदेशातून महाराजांना अभिवादन केलं आहे. महाराजांनी निर्माण केलेल्या राज्याला पुन्हा सक्षम आणि लोकाभिमुख करण्याचा संकल्प करूया,असं पवार यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.