जगभरात सर्वाधिक कोरोनाबाधितांची संख्या असलेल्या देशांत भारत पाचव्या क्रमांकावर
Ekach Dheya
नवी दिल्ली : देशात काल कोरोनाबाधितांच्या संख्येत सलग पाचव्या दिवशी विक्रमी भर पडली. देशभरात काल 9 हजार971 नवे संक्रमित आढळले असून एकूण संख्या आता 2 लाख 46 हजार 628 झाली आहे. गेल्या 24 तासात 287 रुग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत 6 हजार 929 जण कोविड 19 ने मरण पावले असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली. वाढत्या प्रादुर्भावामुळे कोरोना संसर्गाच्या बाबतीत आता भारत जगात 5व्या क्रमांकावर पोहोचला आहे. सध्या देशात 1 लाख 19 हजार 292 रुग्ण बरे झाले असून 1 लाख 20 हजार 406 रुग्ण उपचार घेत आहेत. रुग्णांचा बरे होण्याचं प्रमाण आता 48 पूर्णांक 36 शतांश टक्के झालं आहे.
राज्यात काल २ हजार २३४ कोरोनाबाधित रुग्णांना बरे झाल्यामुळे घरी सोडण्यात आलं असून आतापर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची एकूण संख्या ३७ हजार ३९० झाली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली. कोरोनाच्या २ हजार ७३९ नवीन रुग्णांची काल राज्यात भर पडली असून एकूण संख्या ८२ हजार ९६८ झाली आहे. सध्या राज्यात ४२ हजार ६०० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात काल १२० कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली, या पैकी ३० मृत्यू हे मागील दोन दिवसांतले आहेत, तर उर्वरित मृत्यू, ३ मे ते ३ जून या कालावधीतले आहेत. राज्यातल्या कोरोनाबाधितांच्या मृत्यूंची संख्या आता २ हजार ९६९ झाली आहे.
सध्या राज्यात ४७ शासकीय आणि ३८ खाजगी, अशा एकूण ८५ प्रयोगशाळा कार्यरत आहेत. आजपर्यंत ५ लाख ३७ हजार १२४ नमुन्यांची चाचणी झाली असून, चाचण्यांचं प्रमाण, दहा लाखात ३ हजार ८२७ एवढं आहे. देशपातळीवर हेच प्रमाण २ हजार ८३२ इतकं आहे.
राज्यात ५ लाख ४६ हजार ५६६ लोक गृह विलगीकरणात, तर २९ हजार ०९८ लोक संस्थात्मक विलगीकरणात आहेत. संस्थात्मक विलगीकरण सुविधांमध्ये ७५ हजार ७४१ खाटा उपलब्ध आहेत.