मदतीचे वाटप तालुकास्तरावर सुरू- जिल्हाधिकारी नवल किशोर राम
Ekach Dheya
पुणे : पुणे जिल्ह्यात ‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे जीवित व वित्तहानी झालेली आहे. तसेच शेतीपीक, पॉलीहाऊस व शेडनेट यांचेदेखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. त्यामुळे बाधित नागरीक व शेतकरी यांना शासन निर्णयाप्रमाणे देय मदतीचे वाटप तालुकास्तरावर सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.
आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील कलम २५ अन्वये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आलेली असून जिल्हाधिकारी नवल किशोर राम हे या प्राधिकरणाचे पदसिध्द अध्यक्ष आहेत. शासन निर्णयाप्रमाणे देय मदतीची रक्कम तहसिल कार्यालयामार्फत नागरीक व शेतकरी यांच्या बँकेतील खात्यावर चेक व आर.टी.जी.एस.व्दारे जमा करण्यात येत आहे. परंतु, नैसर्गिक आपत्तीमुळे मदत म्हणून दिलेली रक्कम नागरीक व शेतकरी यांच्या खात्यावरून परस्पर त्यांच्या कर्ज खाते व इतर खाती यामध्ये समायोजीत किंवा कपात करण्यात येऊ नये, अशा सूचना जिल्हाधिकारी राम यांनी सर्व राष्ट्रीयकृत, सहकारी व खाजगी बँकांना दिल्या आहेत.
सर्व राष्ट्रीयकृत, सहकारी व खाजगी बँकांनी नैसर्गिक आपत्तीमुळे मदत म्हणून देय रक्कम नागरीक व शेतक-यांच्या अन्य कर्ज खाती व इतर खाती यांच्यामध्ये परस्पर समायोजित किंवा कपात करण्यात येवू नये असे स्पष्ट केले आहे. अशी बाब निदर्शनास आल्यास संबंधितांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी राम यांनी दिला आहे.