Site icon साप्ताहिक एकच ध्येय

नियमांचे पालन व योग्य खबरदारी घेतल्यास वाघोली लवकरच कोरोनामुक्त होईल – जिल्हाधिकारी नवल किशोर राम

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्वयंशिस्त पाळण्याची गरज

पुणे : पुणे जिल्हयातील वाघोली परिसरात गेल्या काही दिवसात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत आहे. जिल्हा प्रशासन व इतर सर्व समन्वयीन यंत्रणा हा प्रादुर्भाव रोखण्याकरीता चांगल्या प्रकारचे काम करीत आहेत. याबरोबरच नागरिकांनीही याबाबत स्वयंशिस्त पाळणे आवश्यक आहे, प्रशासनाकडून दिल्या गेलेल्या नियमांचे पालन करीत खबरदारी घेतल्यास आपण कोरोनाच्या संकटावर निश्चितपणे मात करु तसेच आगामी काळात यादृष्टीने खबरदारी घेतल्यास व आपले वाघोली गाव व परिसर लवकरच कोरोनामुक्त होईल, असा विश्वास जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज व्यक्त केला.

जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज वाघोली ग्रामपंचायत कार्यालयात प्रशासकीय यंत्रणेसोबतच ग्रामस्थांशी चर्चा केली. यावेळी आमदार अशोक पवार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सई भोरे पाटील, हवेलीचे तहसीलदार सुनील कोळी, लोणीकंदचे पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, सरपंच वसुंधरा उबाळे आदींसह ग्रामपंचायत सदस्य व निवडक ग्रामस्थ उपस्थित होते.

जिल्हाधिकारी राम यांनी वाघोली व परिसरातील सद्य:स्थितीचा आढावा घेतला. यामध्ये एकूण रुग्णांची संख्या, बरे झालेले रुग्ण, गावातील कोणत्या भागात रुग्ण वाढीचे प्रमाण वाढत आहे व त्याची कारणे काय आहेत, बाहेरील जिल्हयातून आलेल्या नागरिकांना विलगीकरण करण्यासंदर्भांतील सुरु असलेली कार्यवाही, जेष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी, मास्कचा व सॅनीटायझरचा वापर तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजनांची त्यांनी माहिती घेतली.

वाघोली परिसरातील वाढती रुग्णसंख्या रोखण्यासाठी स्थानिकांचा पुढाकार महत्वाचा असल्याचे सांगून जिल्हाधिकारी राम म्हणाले, वाघोली परिसरात कोरोना रुग्णसंख्या रोखण्यासाठी कडक उपाययोजना सोबतच स्वयंशिस्त महत्वाची आहे. विलगीकरण प्रक्रीया काटेकोरपणे राबविली गेली पाहिजे. कोरोनाचा प्रार्दुभाव वाढणार नाही याची काळजी ज्याप्रमाणे प्रशासकीय पातळीवर घेतली जाते तशीच काळजी नागरिकांनीही घेणे आवश्यक आहे. कोरोनाचे संकट लगेच संपणारे नाही त्यामुळे प्रत्येक नागरिकाने स्वत:च्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे.

पुणे शहर पूर्वपदावर येण्यासाठी सर्वोतोपरी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत. टप्प्याटप्प्याने व्यवहार सुरळीत करण्यात येत आहेत. नागरिकांनीही वैयक्तिकरित्या या प्रयत्नांना साथ दिली पाहिजे. तसेच प्रतिबंधित उपाययोजना करून संसर्ग रोखण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याला नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद द्यावा, तसेच सोबतच मास्क, सॅनीटायझरचा वापर, सोशल डिस्टसिंग आदींचा वापर करावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी राम यांनी केले.

मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी वाघोलीत कोरोना संसर्गाबाबत प्रतिबंधाकरीता समाजमाध्यमांद्वारे जनजागृती केली जाणार आहे. तसेच नागरिकांनी मास्क, सॅनेटायझर व इतर उपकरणांचा नियमितपणे वापर करावा. तसेच अनावश्यक ठिकाणी होणारी गर्दी टाळावी असे आवाहन त्यांनी केले.

जिल्हाधिकारी राम यांनी भारतीय संस्कृती दर्शनच्या आयुर्वेदिक हॉस्पीटल येथे भेट देवून त्याठिकाणी असणा-या सोईसुविधांबाबत डॉक्टरांशी चर्चा केली. तसेच संस्थात्मक विलगीकरण कक्ष तसेच प्रतिबंधीत क्षेत्राची पाहणी केली व आवश्यक त्या सूचना संबंधित यंत्रणेला दिल्या. यावेळी विविध विभागाचे प्रमुख अधिकारी, स्थानिक नागरिक, स्वयंसेवक उपस्थित होते.

Exit mobile version