Site icon साप्ताहिक एकच ध्येय

आर्थिक सुधारणांच्या आशेने सोन्याच्या किंमतीत घट

मुंबई : लॉकडाउनचे निर्बंध शिथिल केल्याने तसेच जगातील प्रमुख इंडस्ट्रीज सुरू झाल्याने गुंतवणूकदारांनी जोखिमीची गुंतवणूक केली. त्यामुळे मागील आठवड्यात स्पॉट गोल्डच्या किंमतीत २.३ टक्क्यांची घसरण झाली. अर्थव्यवस्थेतील सुधारणेच्या आशेने अमेरिका-चीनदरम्यान व्यापार युद्धाचा ताण कमी झाला असून याचाही सोन्याच्या किंमती कमी होण्यावर परिणाम झाल्याचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलनचे मुख्य विश्लेषक श्री प्रथमेश माल्या यांनी सांगितले.

अमेरिकेतील अनेक व्यावसायिक कामकाज पुन्हा सुरू जाल्याने बेरोजगारीचा दरही घटला. तथापि, अमेरिकेतील व्यापाराने एप्रिल २०२० मध्ये मोठी तूट दर्शवली असून कोरोना व्हायरसमुळे बाजाराच्या भावनांवरही मोठा परिणाम दिसून आला. जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेतील निर्यात घटल्याने अर्थव्यवस्थेतील सुधारणेसाठीचा काळ अपेक्षेपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. या कारणामुळेही सोन्याच्या किंमतीत आणखी घट झाल्याचे श्री माल्या यांनी सांगितले.

चांदीच्या किंमतीत गुरुवारी २.६३ टक्क्यांची घसरण दिसून आली. त्या १७.४ डॉलर प्रति औसांवर बंद झाल्या. एमसीएक्सवरील किंमतीही ५ टक्क्यांनी घसरून ४७,३५१ रुपये प्रति किलोवर बंद झाल्या.

जागतिक मागणी वाढल्याने बाजाराच्या भावनांनाही प्रोत्साहन मिळाल्याने, मागील आठवड्यात कच्च्या तेलाच्या  किंमती २० टक्क्यांनी वाढल्या. एनर्जी इन्फॉर्मेशन अॅडमिनिस्ट्रेशनने अमेरिकेतील कच्च्या तेलाच्या यादीमध्ये २.१ दशलक्ष बॅरलची कमी आल्याचे आपल्या अहवालात नमूद केले आहे  त्यामुळे कच्च्या तेलाच्या किंमतींना आधार मिळाला. रशिया आणि ओपेक देशांनीही जुलै २०२० च्या अखेरपर्यंत ज्यादा उत्पादन कपात सुरूच ठेवण्यावर सहमती दर्शवल्याने कच्च्या तेलाला आधार मिळाला. सौदी अरेबियाने करार झाल्यानंतर तेलाच्या किंमतीत लक्षणीय वाढ केली.

Exit mobile version