Site icon साप्ताहिक एकच ध्येय

निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाचा कोकणातल्या शेती उत्पन्नावर पुढचे दहा वर्ष परिणाम होण्याची शक्यता शरद पवार यांच्याकडून व्यक्त

नवी दिल्ली : निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाचा कोकणातल्या शेती उत्पन्नावर पुढचे दहा वर्ष परिणाम जाणवणार असल्याचं मत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी वर्तवलं आहे. आज रायगड जिल्ह्याला भेट देऊन निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाचा आढावा घेतल्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. आंबा नारळाच्या नुकसानग्रस्त बागा स्वच्छ करणं आणि या बागा पुन्हा लावणं, हे मोठं आव्हान असल्याचं, पवार म्हणाले. पुढच्या चार पाच दिवसांत वीज पुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न करावेत, सरकारने वाटलेलं धान्यही या वादळामुळे खराब झाल्याने पुन्हा धान्यवाटप करावं, असं पवार यावेळी म्हणाले.

या दौऱ्यात पवार यांनी आज माणगाव इथं मुख्य बाजारपेठेतल्या नागरिकांशी संवाद साधून पवार यांनी माहिती घेतली. म्हसळा, दिवेआगारलाही त्यांनी भेट दिली. जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे आणि रायगडचे खासदार सुनील तटकरे यावेळी उपस्थित होते. पवार यांनी जिल्ह्यात म्हसळा इथंही भेट देऊन नुकसानाची पाहणी केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

पवार उद्या रत्नागिरी जिल्ह्याला भेट देऊन चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करणार असल्याचं, पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे. दरम्यान रायगड जिल्ह्यात आज आणखी दोघांचा मृत्यू झाला. यापैकी एक व्यक्ती म्हसळा तालुक्यातली होती. अंगावर झाडं पडल्यानं ती जखमी झाली होती. तर दुसरी व्यक्ती पेण तालुक्यातली होती. मानेला पत्रा लागल्यानं ते जखमी झाले होते. यामुळे रायगड जिल्ह्यात चक्रीवादळानं मृत्यू झालेल्यांची संख्या ६ झाली आहे.

Exit mobile version