Site icon साप्ताहिक एकच ध्येय

खरीप हंगामासाठी पुरेसे बियाणे उपलब्ध असतील याची खबरदारी घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : खरीप हंगामामध्ये बी बियाणांची कमतरता होऊ देऊ नका. बोगस बियाण्यांची विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहेत. शेतकऱ्यांना कर्ज मिळण्यातही अडचणी येऊ नये यासाठी प्रयत्न करण्याचे आदेशही त्यांनी दिले.

खरीप हंगाम कामांचा आढावा व बी बियाणे, खते, किटकनाशके, पिक कर्ज वाटप,  कापूस, तुर व धान खरेदी बाबत काल मुख्यमंत्र्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आढावा घेतला यावेळी ते बोलत होते.

खते व बी बियाणे बांधावर पुरविण्यासाठी ४७ हजाराहून अधिक शेतकरी गट तयार करण्यात आले असून दीड लाख मेट्रिक टनाहून अधिक खत, ८६ हजार मेट्रिक टनाहून अधिक बियाणे, १ लाख ८० कापसाच्या बियाणांची पाकिटं बांधावर देण्यात आली आहेत. एकूण ५ लाख २७ हजार ४८३ शेतकऱ्यांनी याचा लाभ घेतला आहे.

राज्याने खरीप हंगामासाठी ४३.५० लाख मेट्रिक टन इतकी मागणी केंद्राकडे नोंदवली होती त्यापैकी ४० लाख मेट्रिक टन पुरवठ्यास मंजुरी आली आहे. याशिवाय ५० हजार मेट्रिक टन युरियाचं संरक्षित साठा करण्यात येत आहे.

एकंदर  ३८१ लक्ष क्विंटल कापूस खरेदी झाली असून ९ लाख क्विंटल खरेदी राहिली आहे. १८.८१ लाख क्विंटल  तूर खरेदी झाली असून २ लाख शेतकऱ्यांकडून तूर खरेदी करण्यात आली आहे. ८२२ कोटी रुपयांचे  चुकारे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. १८.९० लाख क्विंटल चणा खरेदी झाली असून १५ जुलैपर्यंत मुदतवाढ मागण्यात आली आहे. याचेही चुकारे लवकरच शेतकऱ्यांना देण्यात येतील, अशी माहिती या बैठकीत देण्यात आली.

यावेळी प्रधान  सचिव आभा शुक्ला यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांकडून एकूण ४६ टक्के तर राष्ट्रीयकृत बँकांकडून ७ टक्के पिक कर्ज वाटप झाल्याची माहिती दिली. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी ६२५० कोटी तर राष्ट्रीयकृत बँकांनी २३०० कोटी रुपये पिक कर्ज वाटप केल्याचे त्या म्हणाल्या.

निसर्ग चक्रीवादळामुळे रत्नागिरी आणि रायगड येथे ४ हजार ६५० हेक्टर जमीन आणि १८ हजार हेक्टर फळपिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असल्याची माहितीही देण्यात आली.

Exit mobile version