Site icon साप्ताहिक एकच ध्येय

बंधपत्रित अधिपरिचारीकांना प्राधान्याने शासकीय सेवेत सामावून घेण्यात यावे

विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचे निर्देश

मुंबई : राष्ट्रीय आरोग्य अभियान (एन.एच.एम.) अंतर्गत सेवा बजावलेल्या बंधपत्रित अधिपरिचारीकांना यापुढील शासकीय सेवेतील भरती प्रसंगी प्राधान्याने सेवेत सामावून घेण्यात यावे.  कोविड-19 साथरोग तसेच अन्य आरोग्य सुविधांच्या बाबतीत अधिपरीचारीकांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे. बंधपत्रित अधिपरीचारीकांपैकी अनेकांनी शासकीय सेवेतील प्रवेशाची वयोमर्यादा ओलांडली आहे.  त्यांना अचानक सेवेतून कमी करणे उचित नाही, यादृष्टीने सहानुभूतीपूर्वक धोरण आखणे आवश्यक असून त्याबाबतची कार्यवाही करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले.

आज विधान भवन, मुंबई येथे नागपूर विभागातील बंधपत्रित अधिपरिचारीकांच्या सेवा समस्यांसदर्भात एका बैठकीचे आयोजन करण्यात आले, त्यात यासंदर्भात सविस्तर चर्चा झाली. राज्यातील काही जिल्हा परिषदांमध्ये या अधिपरिचारीकांना सेवेत कायम करण्यात आले तर काही जिल्ह्यामध्ये असे झाले नाही. ही उणिव दूर व्हावी आणि नागपूर विभागात भंडारा, गोंदिया जिल्हयात यापुढील भरतीप्रसंगी अशा अधिपरिचारीकांना प्राधान्याने कायम करण्यात यावे, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष श्री.पटोले यांनी दिले आहेत.

या बैठकीस राष्ट्रीय आरोग्य अभियानचे आयुक्त अनुपकुमार यादव व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

साकोली, लाखनी व लाखांदूर नगरपालिका पाणीपुरवठा योजनांना तातडीने प्रशासकीय मान्यता द्या – विधानसभा अध्यक्ष नाना पटोले

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणांअंर्तगत भंडारा जिल्ह्यातील लाखनी, लाखांदूर व साकोली येथील नगर पालिकेच्या नळ पाणीपुरवठा योजनांसदर्भात आज विधान भवन, मुंबई येथे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक आयोजित करण्यात आली.  बैठकीस भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनिल केदार आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

या तीनही योजनांसाठी तातडीने जागा उपलब्ध करुन देण्याचे आदेश पालकमंत्री सुनिल केदार यांनी भंडारा जिल्हाधिकारी यांना दिले. या योजनांसाठी प्रशासकीय मान्यता आणि अन्य आवश्यक बाबींची तातडीने पूर्तता करण्याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना श्री.पटोले यांनी यावेळी दिल्या.

Exit mobile version