Site icon साप्ताहिक एकच ध्येय

कोविड १९ चे जास्त रुग्ण असलेल्या ठिकाणी घरोघरी जाऊन पाहणी करण्याच्या आरोग्य मंत्रालयाच्या सूचना

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड १९ चा प्रसार आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूचं  प्रमाण आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनानं घरोघरी जाऊन पाहणी करणं,  कोविड चाचणीची सक्षम यंत्रणा विकसित करणं आणि अधिक दक्ष राहणं गरजेचं असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे.

केंद्रीय आरोग्य सचिव प्रीती सुदान यांनी आज कोविड  १९ चा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव असलेल्या देशातल्या  निवडक जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त आणि मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांबरोबर संवाद साधला.

टाळेबंदी मागे घेताना राज्यांनी पुढील काही महिने जिल्हावार नियोजन करावं, असं त्या म्हणाल्या. कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण कमी करण्यासाठी प्रशासनानं कोरोना संसर्गाचा सर्वात जास्त धोका असणारे, वृद्ध नागरिक, अन्य आजार असणारे यांच्याकडे अधिक लक्ष पुरवणं, कोरोना पॉसिटीव्ह व्यक्तीच्या संपर्कात आलेल्यांचा तपास  आणि नागरिकांमध्ये आरोग्य-पूरक  वर्तणुकीला प्रोत्साहन  या उपायांची अंमलबजावणी करावी अशी सूचना त्यांनी केली.

महाराष्ट्र, तेलंगणा, तामिळनाडू, राजस्थान, हरियाणा, गुजरात, जम्मू-काश्मीर, कर्नाटक, उत्तराखंड आणि मध्यप्रदेश या दहा राज्यांमधल्या एकूण ४५ महापालिका क्षेत्रांमध्ये कोविड १९ च्या रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनानं  करायच्या उपाययोजनांबाबत  त्यांनी यावेळी मार्गदर्शन केलं.

कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेसह अन्य आजार असलेल्या रुग्णांना देखील प्रशासनानं सेवा पुरवणं आवश्यक असल्याचं आरोग्यमंत्रालयानं म्हटलं आहे.

Exit mobile version