Site icon साप्ताहिक एकच ध्येय

कोरोनाच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रयोगशाळांनी नमुना तपासणीची क्षमता वाढवावी – विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

पुणे : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहराबरोबरच जिल्हयातील ग्रामीण भागातील रुग्णांच्या नमुना तपासणी करणाऱ्या शासकीय व खाजगी प्रयोगशाळांनी कोविड-19 ची नमुना तपासणीची क्षमता वाढविण्यावर भर द्यावा अशा, सूचना विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी आज दिल्या.

राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था पुणे येथे विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी भेट देवून कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजनाबाबत संस्थेच्या डॉक्टरांसमवेत आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेच्या संचालिका डॉ.प्रिया ॲब्राहम, शीतज्वर विभागाच्या विभागप्रमुख डॉ. वर्षा पोतदार, वैज्ञानिक डॉ. मनोहर चौधरी, डॉ. सुमित भारद्वाज यावेळी उपस्थित होते.

विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर म्हणाले, जिल्हयातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर खासगी आणि शासकीय प्रयोगशाळांमध्ये मोठया प्रमाणात कोविड-19 नमुना तपासणीसाठी येत असतात त्या नमुना तपासणीचा रिपोर्ट वेळेत प्राप्त होण्यासाठी सर्वांनी प्रयोगशाळांची क्षमता वाढविण्यावर भर द्यावा. तसेच नमुना तपासणीचे काम करत असतांना योग्य ती दक्षता घेतली गेली पाहिजे. प्रयोगशाळांसाठी पुरेसे मनुष्यबळ, आवश्यक ते वैद्यकीय साहित्य कमी पडत असल्यास तातडीने जिल्हा प्रशासनाकडे याबाबत प्रस्ताव सादर करावेत. आपणास आवश्यक त्या सोयी सुविधा पुरविण्याकरीता प्रशासन सहकार्य करेल, असेही श्री. म्हैसेकर यांनी सांगितले आणि आतापर्यंत करण्यात आलेल्या नमुना तपासणीबाबतची माहिती घेतली.

राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेतील कोविड-19 ची नमुना तपासणी करणाऱ्या प्रयोगशाळेची पहाणी डॉ.म्हैसेकर यांनी केली. यावेळी वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Exit mobile version