Site icon साप्ताहिक एकच ध्येय

कुरकुंभ औद्योगिक क्षेत्राचे फायर सेफ्टी ऑडिट करुन घ्यावे : जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांचे निर्देश

पुणे : कुरकुंभ औद्योगिक क्षेत्राच्या सुरक्षेच्या दृष्टीने फायर सेफ्टी ऑडिट होणे आवश्यक असून त्यादृष्टीने आवश्यक ती कार्यवाही तात्काळ करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज दिले.

जिल्हाधिकारी नवल किशोर राम व जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी आज कुरकुंभ औद्योगिक परिसराला भेट देऊन येथील उद्योजक, विविध कंपन्यांचे प्रतिनिधी व कामगारांशी संवाद साधला तसेच त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. यावेळी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी अविनाश हदगल व संजीव देशमुख, पोलीस उप अधीक्षक ऐश्वर्या शर्मा, उपविभागीय अधिकारी प्रमोद गायकवाड, कुरकुंभ एमआयडीसी चे कार्यकारी अभियंता एस. आर. जोशी, उपअभियंता मिलिंद पाटील, तहसीलदार संजय पाटील, संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. राम म्हणाले, कुरकुंभ औद्योगिक वसाहतीमध्ये अनेक उद्योगधंदे व कंपन्या असून त्यांच्या सुरक्षेसाठी सर्व उपाययोजना तयार ठेवणे आवश्यक आहे. या औद्योगिक क्षेत्रातील कोणत्याही कंपनीमध्ये आग लागण्यासारखी दुर्घटना घडू नये, यासाठी दक्षता घ्यावी. त्याचबरोबर अत्याधुनिक साधनसामग्री युक्त अग्निशमन यंत्रणा अद्ययावत ठेवावी. कोरोना कालावधीत ‘मिशन बिगीन अगेन’ मध्ये उद्योगधंदे सुरळीत सुरु ठेवून कोरोनावर मात करण्यासाठी कंपन्या परिसरात आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवाव्यात. औद्योगिक परिसरात निवासाची व भोजनाची व्यवस्था करताना सोशल डिस्टंसिंग, हॅन्ड ग्लोज व सॅनिटायझर चा वापर अशा स्वच्छता विषयक नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.

सध्या पुणे जिल्ह्यातील स्थानिक कामगारांवर येथील बहुतांशी कंपन्यांचे कामकाज सुरु आहे. कंपन्यांना आणखी कामगारांची गरज आहे. हे कामगार परजिल्ह्यात गेले असून या जिल्ह्यातून पुण्यात येताना व त्या जिल्ह्यांमध्ये परत जाताना कामगारांना लवकर परवानगी पासेस मिळणे गरजेचे आहे. तसेच प्रवास केल्यावर 7 किंवा 14 दिवस क्वारंटाईन व्हावे लागते, अशा अडचणी कंपन्यांच्या प्रतिनिधींनी जिल्हाधिकारी श्री. राम यांच्यासमोर मांडल्या असता ते म्हणाले, कुरकुंभ एमआयडीसी परिसरात काम करणाऱ्या कामगारांना पुणे जिल्ह्यात येण्यासाठी व येथून संबंधित जिल्ह्यात जाण्यासाठी परवानगी मिळवून देण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करण्याबरोबरच संबंधित सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी समन्वय ठेवून याबाबत लवकरच कार्यवाही करण्यात येईल येईल.

पोलीस अधीक्षक संदीप पाटील म्हणाले, पुणे जिल्ह्यातील कंपनीत कामावर उपस्थित राहण्यासाठी परजिल्ह्यातून येणाऱ्या कामगारांना अडवले जाणार नाही. तसेच पुण्यातून परजिल्ह्यात जाणाऱ्या कामगारांना पास मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.

Exit mobile version