Site icon साप्ताहिक एकच ध्येय

चक्रीवादळग्रस्तांना विशेष बाब म्हणून वाढीव मदत कोकणवासियांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे – मुख्यमंत्री

मुंबई :  निसर्ग चक्रीवादळामुळे बाधित झालेल्या व्यक्तींना एनडीआरएफ आणि एसडीआरएफचे दर बाजूला ठेऊन वाढीव मदत करण्यासाठी  शासनाने विशेष बाब म्हणून  निकषात बदल केल्याची  माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली, कोकणातील नुकसानग्रस्तांच्या पाठीशी हे शासन खंबीरपणे  उभे असल्याची ग्वाहीदेखील मुख्यमंत्र्यांनी दिली.

कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीनंतर माध्यम प्रतिनिधींशी बोलतांना त्यांनी ही माहिती दिली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात  यांच्यासह मंत्रिमंडळातील अन्य सदस्य उपस्थित होते.

नुकसानभरपाईच्या निकषातील बदलांमुळे भरीव मदत

मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, वादळानंतर झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहेच तत्पूर्वी रायगडसाठी १०० कोटी, रत्नागिरीला ७५ कोटी आणि  सिंधुदूर्गला २५ कोटी रुपयांची मदत शासनाने जाहीर केली आहे. नुकसान भरपाईचे निकष बदलण्याची गरज असल्याने तशा सूचना विभागाला देण्यात आल्या होत्या. या बदललेल्या निकषाप्रमाणे सर्वांना नुकसानभरपाई दिली जाईल हे ही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बदललेल्या निकषांची सविस्तर माहिती दिली.

बदललेल्या निकषामुळे मदतीत दीड ते तीनपट वाढ

वीजपुरवठा सुरळीत करण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न

चक्रीवादळाने रायगड-रत्नागिरी मध्ये वीजेचे खांब कोसळले आहेत, ते उभारण्याचे काम सुरु आहे. वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी इतर जिल्ह्यातील तांत्रिक मनुष्यबळ तिथे नियुक्त करण्यात आले आहे. येथील वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु असल्याचे  मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

कापूस उत्पादकांचा कापूस शासन खरेदी करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

मंत्रिमंडळ बैठकीत कापूस खरेदीसंदर्भात चर्चा करण्यात आली यासंदर्भात पणन विभाग, सीसीआयसह सर्व संबंधितांची बैठक घेण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. ते म्हणाले की, सीसीआयने सप्टेंबरपर्यंत कापूस खरेदीची तयारी दर्शविली होती परंतू पावसामुळे ही खरेदी तत्काळ झाली पाहिजे ही राज्य शासनाची भूमिका त्यांना सांगण्यात आली असून कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा कापूस शासन खरेदी करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मका, तूर, चणाडाळ, धान याची खरेदी अन्न नागरी पुरवठा व पणन विभागाकडून करण्यात येत असल्याचे ते म्हणाले. शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमत मिळेल हेही त्यांनी स्पष्ट केले.

पूरग्रस्तांना तातडीने मदत करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना

कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात गेल्यावर्षी पुराने नुकसान झालेल्या पूरग्रस्तांचे पैसे तातडीने देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती अजित पवार यांनी दिली. मदत पुनर्वसन विभाग यासंदर्भातील प्रस्ताव पाठवत असल्याचे ते म्हणाले.  कोकणवासियांना पंतप्रधान आवास योजना, गृहनिर्माण विभाग यांच्यामार्फत पक्की स्लॅबची घरे बांधण्यासाठी मदत करण्याचा प्रयत्न असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. पवार यावेळी म्हणाले.  निसर्ग वादळामुळे अडचणीत आलेल्या आदिवासी बांधवांना खावटी कर्जापेक्षा खावटी अनुदान देण्याचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी दिल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

रायगड, रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांना तातडीची मदत म्हणून वीजपुरवठा सुरळीत होईपर्यंत प्रतिरेशनकार्ड ५ लिटर रॉकेल मोफत देण्याची घोषणा उपमुख्यमंत्र्यांनी केली.  याशिवाय त्यांना रेशन दुकानातून तांदूळ तसेच इतर धान्य उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

यंत्रणेने परिस्थिती चांगली हाताळली- महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

सतर्कता काय असते हे निसर्ग चक्रीवादळाच्या निमित्ताने दिसून आल्याचे स्पष्ट करून महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, एनडीआरएफ, एसडीआरएफ, महसूल यंत्रणा, पोलीस आणि इतर सर्वच यंत्रणांनी निसर्ग चक्रीवादळात चांगल्या पद्धतीने परिस्थिती हाताळली. जीवित हानी होऊ नये यासाठी प्रयत्न केले.  आता नुकसानभरपाईच्या रकमेत चांगली वाढ करून शासनाने नुकसानग्रस्तांना दिलासा दिल्याचेही त्यांनी सांगितले.

Exit mobile version