Site icon साप्ताहिक एकच ध्येय

शालेय विद्यार्थ्यांना सुरक्षित, पौष्टिक आहारासाठी व्यापक उपाययोजना – अन्न व औषध प्रशासनमंत्री जयकुमार रावल

विद्यार्थ्यांना पौष्टिक व सकस आहारासंदर्भात ठाण्यात कार्यशाळा संपन्न

मुंबई : विद्यार्थ्यांचा चटपटीत जंकफूड खाण्याकडे ओढा वाढत चालला आहे. त्यामुळे आरोग्याच्याही तक्रारी वाढत असून जंकफूडचा आरोग्यावर विपरित परिणाम होऊ लागला आहे. शालेय विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहेत. म्हणूनच शाळा,कॉलेजमधील विद्यार्थ्यांना व्यापक शैक्षणिक  अभ्यासक्रमाबरोबरच सुरक्षित, पौष्टीक व  सकस आहारासंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी शासन व्यापक उपाययोजना करेल, असे अन्न व औषध प्रशासनमंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले. त्यासाठी प्राचार्य,मुख्याध्यापक, कॅन्टीनचालक आणि पालक यांनी एकत्रित योगदान द्यावे.आपल्या स्तरावरून जनजागृती करून अन्न व औषध प्रशासन विभागाने याबाबत सुनिश्चित केलेल्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

शाळा, कॉलेजमधील विद्यार्थ्यांना पौष्टिक व सकस आहारासंदर्भात ठाणे येथे आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. शाळा, कॉलेजमधील विध्यार्थ्यांना सुरक्षित, पौष्टिक व सकस आहार मिळावा यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने मंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई प्रदेशस्तरीय एकदिवसीय कार्यशाळेचे ठाण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेसाठी विविध शाळा व कॉलेजचे प्राचार्य, मुख्याध्यापक, कॅन्टीनचालक तसेच पालक उपस्थित होते. अशा प्रकारच्या कार्यशाळेचे आयोजन करून विध्यार्थ्यांना सुरक्षित व  पौष्टिक आहारासंदर्भात जनजागृती करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे.

या कार्यशाळेत ठाण्याच्या महापौर मीनाक्षी शिंदे, अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्त डॉ. पल्लवी दराडे,एफएसटीचे अध्यक्ष निलेश लेले, डॉ.जगमीत मदान आदींनी मनोगत व्यक्त केले. तसेच राज्यातील विविध विभागाचे उपायुक्त कार्यशाळेत उपस्थित होते.

स्वस्थ भारत घडवण्यासाठी “जंक फूड हटवूया, स्वस्थ भारत घडवूया” असा संदेश मंत्री श्री. रावल यांनी उपस्थितांना दिला. त्याचबरोबर पोषक आहार,खाद्यपदार्थांची सुरक्षा व स्वच्छतेबाबत अन्न व औषध प्रशासन विभागाने सुनिश्चित केलेली मार्गदर्शक तत्वे प्रशासनामार्फत राज्यातील 16 हजार925 इतक्या शाळा व महाविद्यालयापर्यंत पोहोचविण्यात आली असल्याची माहिती मंत्री श्री.रावल यांनी दिली. तसेच या मार्गदर्शक तत्वांबाबत विस्तृत मार्गदर्शन केले. यामध्ये चेकलिस्टच्या अंमलबजावणीसाठी शिक्षक, पालक,विद्यार्थी आणि कॅन्टीनचालक यांचे युनिट गठित करणे, पौष्टिक व सकस अन्न पुरवण्यासाठी कॅन्टीन धोरण विकसित करणे, संतुलित आहार आणि त्याचे आरोग्यावर परिणाम याची कार्यशाळा वर्षातून एकदा आयोजित करणे, शाळा, कॉलेजजवळ 50 मीटर परिसरात चिप्स, तळलेले अन्न, बटाटा फ्राईड, गोडपदार्थ विक्रीस प्रतिबंध करणे, कॅन्टीनमध्ये अन्न सुरक्षा मानके कायद्याचे पालन आदीबाबत विस्तृत मार्गदर्शन केले. तसेच स्वस्थ व मजबूत भारत निर्माण करण्यासाठी शहराबरोबरच गावात राहणाऱ्या शेवटच्या माणसापर्यंत पौष्टिक, सकस आहार व अन्न सुरक्षाबाबत काळजी घेतली जाईल, असेही मंत्री श्री. रावल म्हणाले.

Exit mobile version