कोरोनाच्या अटकावासाठी प्रत्येकाने दक्षता बाळगण्याची गरज – डॉ. अविनाश भोंडवे
Ekach Dheya
‘यशस्वी’ संस्थेच्यावतीने आयोजित ‘कोरोनाविषयक जनजागृती कार्यशाळा’ संपन्न
पिंपरी : लॉकडाऊनचा कालावधी शिथिल होत असताना व विविध ठिकाणी खासगी कार्यालयांचे कामकाज सुरु होत असताना आता प्रत्येकाने दक्षता बाळगण्याची गरज आहे असे मत इंडियन मेडिकल असोसिएशनचे महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ.अविनाश भोंडवे यांनी व्यक्त केले. ते बुधवारी चिंचवड येथील ‘यशस्वी’संस्थेच्यावतीने आयोजित ‘कोरोना विषयक जनजागृती कार्यशाळेत मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी त्यांनी कोरोना विषाणूचा प्रसार नेमका कशाप्रकारे होतो, कोरोना बधिताची लक्षणे काय आहेत, कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून कशाप्रकारे उपाययोजना करायला हव्यात याबाबत सविस्तर माहिती सांगितली.
विशेषतः नोकरदार व्यक्तींनी कामाच्या ठिकाणी कशाप्रकारे खबरदारी घ्यावी याबद्दल ही सविस्तर माहिती सांगितली. नोकरीच्या ठिकाणी व्यवस्थापन व कर्मचारी या दोन्ही घटकांनी खबरदारीच्या प्रतिबंधात्मक उपायांची काटेकोर अंमलबजावणी करावी असेही डॉ.भोंडवे यांनी सांगितले. विशेष बाब म्हणजे या काळात कोणत्याही अफवेला बळी न पडता योग्य ती माहिती जाणकारांकडूनच घ्यावी असे सांगत आपले निष्काळजीपूर्वक वर्तन हे कोरोनासाठी आमंत्रण ठरू नये यासाठी सर्वांनीच जबाबदारीपूर्वक वर्तन करावे असे आवाहन त्यांनी केले. यावेळी ‘यशस्वी’ संस्थेच्या शैक्षणिक विभाग प्रमुख डॉ. सुनिता पाटील यांनी डॉ. भोंडवे यांचे आभार मानले. तर यावेळी कार्यक्रमाला संस्थेचे संचालक मकरंद कुलकर्णी, संस्थेच्या मनुष्यबळ व्यवस्थापिका मनीषा खोमणे, ऑपरेशन हेड कृष्णा सावंत यांच्यासह सामाजिक अंतराचे नियम पाळत मोजकेच कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन संस्थेचे पवन शर्मा यांनी केले.