रायगड, रत्नागिरीतील निसर्ग चक्रीवादळ बाधितांना प्रतिकुटुंब दहा किलो गहू व तांदळाचे मोफत वाटप
Ekach Dheya
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची माहिती
मुंबई : निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड,रत्नागिरी जिल्ह्यांना मोठा फटका बसला असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. येथील बाधित नागरिकांसाठी शासनाकडून विविध स्तरावर मदत करण्यात येत असून राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा विभागाच्या वतीने प्रतिकुटुंब दहा किलो गहू व दहा किलो तांदूळ मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संबंधित जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना धान्य प्राप्त झाले असून त्याचे वाटप सुरु करण्यात आले असल्याची माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.
खासदार शरद पवार यांनी नुकतीच निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची पाहणी केली. त्यावेळी आपद्ग्रस्त भागातून पवार साहेब यांनी दूरध्वनीद्वारे छगन भुजबळ यांच्याशी याबाबत संपर्क साधला होता. त्यानंतर छगन भुजबळ यांनी या भागात तातडीने अन्नधान्याचे वाटप करण्याचे आदेश दिले असून या भागातील नुकसानग्रस्त नागरिकांना अन्नधान्य वाटप सुरु करण्यात आले आहे.
निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात मोठे नुकसान झाले असून येथील नागरिकांना दिवा लावण्यासाठी देखील केरोसीन उपलब्ध नसल्याने याआधीच राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा विभागाच्यावतीने ५ लिटर मोफत केरोसिनचे वाटप यापूर्वीच सुरु केले आहे. त्याचसोबतच आता रायगड व रत्नागिरी जिल्ह्यातील बाधित नागरिकांसाठी राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा विभागाच्यावतीने प्रतिकुटुंब दहा किलो गहू व दहा किलो तांदळाचे मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला असून याबाबत जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना धान्य प्राप्त झाले असून त्याचे वाटप सुरु करण्यात आले आहे. त्यानुषंगाने रायगड जिल्ह्यातील जिल्ह्यातील ७ लाख ६९ हजार ३३५ इतक्या शिधापत्रिकाधारकांना तर रत्नागिरी जिल्ह्यातील ९४ हजार ५२६ इतक्या शिधापत्रिकाधारकांना या मोफत धान्याचा लाभ देण्यात येत असल्याचे छगन भुजबळ यांनी सांगितले आहे.