पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरामध्ये मुख्य व अंतर्गत रस्त्यांवर अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. यामध्ये किरकोळ अपघात/गंभीर अपघात/आणि अतिशय गंभीर अपघात की ज्यामुळे नागरिकांना आपला प्राण गमवावा लागला आहे, अशा अपघातांचा समावेश आहे. अपघात होण्याचे प्रमुख कारण म्हणजे पिंपरी चिंचवड शहरातील अशास्त्रीय/अमानांकित गतिरोधक आहेत, असे आमच्या जागृत नागरिक महासंघाचे ठाम मत आहे.
याबाबत पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त मा.श्री.आर.के. पदमनाभन यांना निवेदन देेण्यात आले. अशी माहिती जागृत नागरिक महासंघाचे अध्यक्ष नितीन श. यादव यांनी साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्राला दिली.
आम्ही आमच्या संस्थेतर्फे शहरातील मनपाच्या अ/ब/क/ड/इ/फ/ग/ह या सर्व क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत मनपा तर्फे बनवलेल्या गतिरोधकांचा आढावा घेतला. नुकतेच आम्ही ” ह ” क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत ( कासारवाडी) शंकरवाडी रोड ते “ह” क्षेत्रिय कार्यालय परिसरातील सर्व गतीरोधकांची मनपाच्या स्थापत्य विभागाचे अभियंता श्री.गवळी आणि श्री. दांगडे यांना सोबत घेऊन प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणीमध्ये असंख्य गतिरोधक हे अशास्त्रीय व अमानांकित पद्धतीने बनवल्याचे दिसून आले. तसेच सदर गतिरोधकांसाठी मनपाने वाहतुक पोलिसांची कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे आढळून आले आहे.
पिंपरी चिंचवड मनपाने शहरातील सर्व क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत मुख्य आणि अंतर्गत रस्त्यावर शेकडो गतिरोधक बनवले आहेत. आम्ही महासंघातर्फे सर्व मनपा क्षेत्रीय कार्यालयअंतर्गत रस्त्यावरील गतिरोधकांचा सर्वे केला आहे. यासर्वेमध्ये सदरपैकी 80% ते 90% गतीरोधक हे अशास्त्रीय व अमानांकित आहेत, तसेच वाहन चालकांच्या सुरक्षिततेसाठी कोणत्याही प्रकारचे फलक लावलेले नाहीत.
अशास्त्रीय/अमानांकित पद्धतीने बनवलेल्या गतिरोधकांमुळे अपघातांशीवाय शहरातील नागरिकांच्या पाठीच्या मणक्याचे आणि मानेच्या विकारांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येत आहे. वाहतूक पोलिसांची कोणतीही परवानगी न घेता मुख्य रस्त्यांवर आणि अंतर्गत रस्त्यांवर स्वतःच्या मनमानीने, वाट्टेल तिथे, वाट्टेल तेवढे व वाट्टेल तसे गतिरोधक बनविणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर आपण गुन्हे दाखल करण्यासाठी आदेश पारीत करावेत. शिवाय सदरचे विनापरवाना व अशास्त्रीय पद्धतीने बनवलेले सर्व अनाधिकृत व बेकायदेशीर गतिरोधक तात्काळ काढून टाकण्यासाठी आपण मनपाला आदेश दयावेत.
शहरातील नागरिकांचे आरोग्य व स्वास्थ्य अबाधित राहण्यासाठी आपण सकारात्मक भूमिका घेवून योग्य तो निर्णय घ्यावा. अशी मागणी जागृत नागरिक महासंघाचावतीने पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त यांना करण्यात आली. तसेच पोलीस आयुक्त योग्य तो निर्णय घेतील याची आम्हालाा खात्री आहे.