कोविड-१९ ने मरण पावलेल्यांचे मृतदेह हाताळण्यात यंत्रणेला अपयश येत असल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
Ekach Dheya
नवी दिल्ली : कोविड-१९ ने मरण पावलेल्यांचे मृतदेह हाताळण्यात यंत्रणेला अपयश येत असल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयानं ताशेरे ओढले आहेत. विविध राज्यांमधे कोविड रुग्णांची आणि मृतदेहांची आबाळ होत असल्याबद्दल स्वतःहून दखल घेत न्यायालयाने केंद्रासह दिल्ली, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, आणि तमिळनाडू या राज्य सरकारांना नोटिसा बजावल्या आहेत.
मृतदेहांची स्थिती भयावह असून, केंद्र सरकारनं त्याविषयी जारी केलेल्या सूचनांचे पालन झाले की नाही, अशी विचारणा न्यायालयाने सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांकडे केली आहे. दिल्लीच्या रुग्णालयांमधे कोविडने मृत्यू पावलेल्यांचे मृतदेह एकावर एक ठेवल्याचे आढळले होते. तर अनेक ठिकाणी रुग्णांच्या शेजारीच मृतदेह ठेवण्यात आले होते. अनेक ठिकाणी मृतदेहांची हेळसांड होत असल्याची दखल घेऊन सरन्यायाधीश न्यायमूर्ती शरद बोबडे यांनी न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठाकडे त्याची सुनावणी सोपवली आहे.