Site icon साप्ताहिक एकच ध्येय

कोविड-१९ चा प्रादुर्भाव येत्या नोव्हेंबरपर्यंत शिगेला पोहोचण्याची शक्यता असल्याचं आयसीएमआरच्या अभ्यासगटाचा अंदाज

नवी दिल्ली : कोविड-१९ चा फैलाव भारतात येत्या नोव्हेंबरच्या मध्यावर शिगेला पोचेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. लॉकडाऊनमुळे कोविड फैलावाला काहिशी खीळ बसली असून, त्याचा शिगेला पोहोचण्याचा काळ सुमारे ८ आठवड्यांनी पुढे गेला असल्याचं भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं नेमलेल्या संशोधन पथकाच्या अभ्यासात दिसून आलं आहे. लॉकडाऊनमुळे कोरोना संसर्ग ६९ते ९७टक्के रोखला गेला आणि त्यामुळे आरोग्य आणि वैद्यकीय सुविधा उभारण्यासाठी पुरेसा अवकाश मिळाला, असं अहवालात नमूद केलं आहे.

कोविड-१९ चा मृत्युदरही आटोक्यात राहिला असून, यापुढे या संकटाशी सामना करण्याच्या दृष्टीनं आरोग्य सुविधा मजबूत करण्यावर भर देणारं सर्वंकष धोरण आवश्यक असल्याचं या पथकानं म्हटलं आहे.

देशात आरोग्यविषयक पायाभूत सुविधा अधिक मजबूत करण्यात आल्या असून, सध्या ९५८ कोविड रुग्णालयं २ हजार ३१३ कोविड आरोग्यकेंद्र त्याचप्रमाणे १० हजार ७४८ अतिदक्षता खाटा आणि ४६ हजार ६३५ ऑक्सिजनसुविधा असलेल्या खाटा उपलब्ध असल्याचं अलिकडेच केंद्रीय आरोग्यमंत्रालयानं जाहीर केलं आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेवर या महामारीमुळे होणा-या परिणामांबद्दल अहवालात म्हटलं, की यामुळे जीडीपी दर ६ पूर्णांक २ दशांश टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता आहे.

Exit mobile version