राज्यातल्या कोरोनामुक्त भागात शाळा टप्याटप्यानं सुरु करण्याचा राज्यसरकारचा निर्णय
Ekach Dheya
नवी दिल्ली : राज्यातल्या शाळा टप्प्या-टप्प्यानं सुरु करायला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली आहे. विषाणूचा प्रादुर्भाव नसलेल्या ग्रामीण, तसंच शहरांपासून दूरवरच्या शाळा प्रत्यक्ष सुरु करण्याचा तसंच इतर ठिकाणी ऑनलाईन, डिजिटल पद्धत पायलट प्रॉजेक्ट म्हणून तातडीनं राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
आज दुपारी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीत दूरदृष्यप्रणालीद्वारे झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी, ‘शाळा एकवेळ सुरु नाही झाल्या, तरी शिक्षण सुरु झालं पाहिजे’ या विधानाचा पुनरुच्चार केला. ज्या ठिकाणी शाळा प्रत्यक्ष सुरु होत आहेत तिथे विद्यार्थ्यांच्या आरोग्याची पुरेपूर काळजी घ्यावी असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
शाळा सुरु करण्यासाठी सुरुवातीला शाळा व्यवस्थापन समित्यांची सभा आयोजित केली जाईल, गावांमधल्या कोविड प्रतिबंध समिती तसंच स्थानिक पदाधिका-यांशी चर्चा केली जाईल, शाळांमध्ये स्वच्छता, निर्जंतुकीकरण, पाण्याची सोय केली जाईल. रेड झोनमध्ये नसलेल्या ९वी, १०वी, १२वी तसंच शाळा-कॉलेज जुलैपासून, ६ वी ते ८ वी चे वर्ग ऑगस्ट पासून, तिसरी ते पाचवीचे वर्ग सप्टेंबरपासून, पहिली-दुसरीचे वर्ग शाळा व्यवस्थापन समितीच्या मान्यतेनं आणि इयत्ता ११ वीचे वर्ग दहावीच्या निकालानंतर सुरु करण्याचं नियोजन आहे. ज्या ठिकाणी शाळा सुरु होणार नाही तिथे टाटा स्काय, जिओ यांच्या मदतीनं शिक्षणाचं पायलट प्रोजेक्ट लगेचच सुरु करून त्याचा बारकाईने आढावा घेण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दूरदर्शन आणि आकाशवाणीचा उपयोग प्राधान्यानं करून घेण्याची विनंती केली. यासंदर्भात केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याशी आपण लगेच बोलून ही माध्यमं देखील उपलब्ध करून घेतली जातील असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
पहिली-दुसरीच्या मुलांना ऑनलाईन पर्याय दिला जाणार नाही. मात्र तिसरी ते पाचवीच्या मुलांना दररोज १ तास आणि पुढच्या वर्गाच्या मुलांना दोन तासांपर्यंत ऑनलाईन, डिजिटल शिक्षण देण्याचं नियोजन आहे अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली. चक्रीवादळाचा तडाखा बसून कोकणातल्या ज्या शाळांचं नुकसान झालंय, त्यांना तातडीने दुरुस्तीसाठी निधी दिला जाणार आहे. वर्गात कमी मुलं बसवणं, व्हॉटसऍप ग्रुप्सवरून शिक्षकांनी मुलांचं शंका समाधान करणं, एक दिवसाआड शाळा तसंच सम -विषम पर्यायावर देखील बैठकीत विचार करण्यात आला.