Site icon साप्ताहिक एकच ध्येय

बालगृहातील बालकांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये याची दक्षता घ्या- महिला व बालविकासमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांचे निर्देश

राज्य बाल हक्क संरक्षण आयोग आणि आयजेएमच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरावरील वेबिनार संपन्न

मुंबई : कोविड – १९ च्या पार्श्वभूमीवर एक वेगळ्या प्रकारच्या जीवनशैलीस आपण सामोरे जात आहोत. बालगृहांमध्ये मुलांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये याची तसेच त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याची योग्य ती काळजी घेण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज दिले.

‘महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग’ आणि ‘इंटरनॅशनल जस्टीस मिशन (आयजेएम)’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘महाराष्ट्रातील बालगृहे, बालनिरीक्षणगृहे यांच्याकरिता राष्ट्रीय स्तरावरील वेबिनारचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी अध्यक्षस्थानावरून महिला व बालविकासमंत्री ॲड. ठाकूर बोलत होत्या.

लॉकडाऊनच्या काळात बालगृहांमध्ये करावयाची व्यवस्था तसेच अत्यावश्यक सेवा पुरवठा करताना वेगळ्या पद्धतीने प्रमाणित कार्यप्रणालीचा अवलंब करावा लागेल. त्यानुसार विभागाकडून कार्यवाही करण्यात येत आहे. याकरिता तंत्रज्ञानाची मदत घेणे आवश्यक आहे.  तसेच मुलांनादेखील प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करण्यास शिकविणे ही काळाची गरज आहे. बालगृहातील मुलांना आरोग्यविषयक सवयी तसेच स्वच्छते विषयक सवयी शिकविणे, मास्क वापरणे या सर्व उपाययोजनांचा वापर कोरोना  प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आला पाहिजे. त्यादृष्टीने वेबिनारद्वारे प्राप्त होणाऱ्या माहितीचा उपयोग करण्याच्या सूचनाही महिला व बालविकासमंत्री ॲड. ठाकूर यांनी यावेळी दिल्या.

कोविड-१९ च्या अनुषंगाने बालगृहे/ बाल निरीक्षण गृहे/ बाल संरक्षण संस्थांमधील बालकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून करावयाच्या उपाययोजनांवर चर्चा करून प्रशिक्षण देण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याचे राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या सचिव श्रीमती सीमा व्यास यांनी सांगितले.

आयजेएमच्या संचालक श्रीमती मेलिसा यांनी लॉकडाउनच्या नंतरच्या काळात सर्वसमावेशक योजना तयार करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. राज्यातील बाल  संरक्षण संस्था / बालगृहे यांनी आगामी आव्हानांवर एकत्रितरीत्या तोडगा काढला पाहिजे. काळजी व संरक्षणाची गरज असलेली बालके व विधी संघर्षग्रस्त बालके यांचे हितरक्षक म्हणून काम करताना अशा बालकांच्या शारीरिक व मानसिक स्वास्थ्याचा विचार करणे व आताच्या कठीण काळात त्यांच्या सुरक्षिततेविषयी जागृत राहणे हे आपले कर्तव्य असल्याचे सांगितले.

महिला व बाल विकास आयुक्त ऋषिकेश यशोद यांनी कोरोना परिस्थितीमध्ये बालकांना पुरेशा साधन सामुग्रीचा पुरवठा प्राधान्याने होण्याकरिता विभागामार्फत आधुनिक कार्यप्रणालीचा वापर करण्यात येईल असे म्हटले.

माहिती दिली की करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना १५ जूनच्या शासन निर्णयान्वये निर्गमित केल्याचे  शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी यांनी सांगितले.  डिजिटल माध्यमांचा वापर करून, दीक्षा ॲप, दूरदर्शन, खाजगी वाहिन्या तसेच दुर्गम भागातील मुलांसाठी रेडिओ या माध्यमांचा वापर अध्यापनासाठी करण्यात येणार आहे अशी माहितीही त्यांनी दिली. बालगृहातील बालकांच्या शिक्षणासाठी दूरदर्शन, टॅबलेट, गूगल क्लासरूम या डिजिटल माध्यमांच्या मदतीने शिक्षण देण्यासाठी महिला व बालविकास विभागाबरोबर कार्यप्रणाली निश्चित करता येईल असे ते म्हणाले.

आरोग्य सेवा संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी कोरोना विषाणूची उत्पत्ती, त्याचा प्रसार, विविध लक्षणे, निदान निश्चिती आदीविषयी माहिती दिली.

या प्रशिक्षण कार्यशाळेत राज्यातील महिला व बालविकास विभाग, बाल कल्याण समिती, बालगृहे / बाल निरीक्षण गृहे/ बाल संरक्षण संस्था, बालकल्याण समितीचे अध्यक्ष व सदस्य, सार्वजनिक आरोग्य विभागाचे अधिकारी, शिक्षण विभागाचे अधिकारी व बालकांच्या क्षेत्रात काम करणारे तज्ज्ञ असे सुमारे साडेपाचशेहून अधिक अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. यामध्ये विविध क्षेत्रातील वक्त्यांनी विषयाच्या अनुषंगाने मते मांडली.

प्रेरणा संस्थेच्या सहसंस्थापक व संचालक श्रीमती प्रीती पाटकर यांनी बालकांना बालगृहात प्रवेश देताना व बाहेर सोडताना घ्यावयाची दक्षता याबाबत सविस्तर माहिती दिली. केईएम रुग्णालयाचे फॉरेन्सिक विभाग प्रमुख डॉक्टर हरीश पाठक यांनी बालगृहे, बालनिरीक्षणगृह, बाल संरक्षण संस्थांमधील स्वच्छता, निर्जंतुकीकरण, मास्कचा वापर, विलगीकरण आदी उपाययोजनांबाबत माहिती दिली. महिला व बाल विकास आयुक्तालयाचे उपायुक्त रवी पाटील यांनीही कायद्यातील तरतुदींची उपयुक्त माहिती दिली.

Exit mobile version