नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गलवान खोऱ्यात काल मध्यरात्री झालेल्या चकमकीत चीनला चांगलाच तडाखा बसला असून त्यांचे ४० पेक्षा जास्त सैनिक ठार किंवा गंभीर जखमी झाले आहेत. अमेरिकेच्या गुप्तचर अहवालात ही माहिती दिली आहे. ही गंभीर जखमी आणि मृतांची एकत्रित संख्या असल्याचं या अहवालात म्हटलंय. या भागात जैसे थे स्थिती असताना ती बदलण्याचा एकतर्फी प्रयत्न चीनच्या बाजूनं झाल्यामुळे ही चकमक उडाल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे.
या चकमकीत दोन्ही बाजूंची जीवितहानी झाली. याआधी उच्चस्तरावर झालेल्या कराराचं प्रामाणिकपणे पालन चीननं केलं असतं तर ही हानी टळली असती, असंही परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलंय. सोमवारी रात्री लडाखमधे गलवान खोऱ्यात चीन आणि भारताच्या सैनिकांमधे चकमक उडाली होती, मात्र आता ती थांबली असल्याचं लष्कराच्या प्रसिद्धिपत्रकात म्हटलं आहे.
याठिकाणी गंभीररित्या जखमी झालेले १७ जवान मृत्युमुखी पडले आहेत. त्यामुळे शहीद सैनिकांची संख्या २० झाली आहे. आधी एक अधिकारी आणि दोन सैनिक शहीद झाले होते.
या चकमकीत शहीद झालेले कर्नल संतोष बाबू यांचा पार्थिव देह आज संध्याकाळपर्यंत त्याच्या गापी, तेलंगणात सूर्यापेट इथं आणला जाईल, असं सूत्रांनी सांगितलं. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी सर्व व्यवस्था केली जात असल्याचं लष्कराच्या तसंच राज्य सरकारच्या यंत्रणांनी सांगितलं.