मराठवाड्यातील कुणबी समाजाचा इतर मागासवर्ग प्रवर्गात समावेश करा – विधानसभा अध्यक्ष नाना पटोले
Ekach Dheya
मुंबई : मराठवाड्यातील कुणबी समाजाचा इतर मागासवर्ग प्रवर्गात समावेश करण्याच्या दृष्टीने राज्य मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून उचित कार्यवाही करण्यात यावी तसेच मराठा अक्करमाशी, साळू मराठा, वायंदेशी मराठा यांची कुणबी असल्याबाबतची न्याय्य बाजू राज्य मागासवर्ग आयोगासमोर मांडली जावी, अशी सूचना विधानसभा अध्यक्ष श्री. नाना पटोले यांनी केली.
या विषयासंदर्भात आज विधानभवन मुंबई येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस इतर मागासवर्ग बहुजन कल्याण विभागाचे प्रधान सचिव, जे.पी.गुप्ता, विधी व न्याय विभागाचे सचिव आणि विधानमंडळ सचिवालयाचे प्रभारी सचिव, राजेंद्र भागवत, सहसचिव नि.वी.जीवणे, यो.ही.अमेटा यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
राज्यातील कुणबी समाजाचे योग्य प्रकारे सर्वेक्षण व्हावे, राज्याच्या सर्व विभागातील कुणबी समाजाचा इतर मागासवर्ग समाजात समावेश व्हावा. राज्याच्या एका विभागात कुणबी समाजातील काही घटक खुल्या प्रवर्गात आहेत तर दुसऱ्या विभागात आरक्षित विभागात येतात, ही तफावत समतोल दृष्टीकोन स्वीकारुन तातडीने दूर होणे आवश्यक आहे, अशी सूचना अध्यक्ष श्री. नाना पटोले यांनी यावेळी केली.