Site icon साप्ताहिक एकच ध्येय

एमबीबीएस आणि बीएएमएस डॉक्टरांच्या वेतनातील तफावत तातडीने दूर व्हावी- विधानसभा अध्यक्ष नाना पटोले

मुंबई : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत एमबीबीएस आणि बीएएमएस डॉक्टरांच्या वेतनातील तफावत तातडीने दूर करण्यात यावी. कोविड-१९ मुळे उद्भवलेल्या परिस्थितीत आयुष वैद्यकीय अधिकारी जोखीम पत्करुन उत्तम सेवा बजावत आहेत. त्यांना एमबीबीएस वैद्यकीय अधिकाऱ्यांप्रमाणे वाढीव वेतन आणि अन्य सुविधा तातडीने उपलब्ध व्हाव्यात, अशी सूचना विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत आयुष वैद्यकीय अधिकाऱ्यांवरील अन्याय दूर करण्यासह त्यांचे वेतन वाढविण्याबाबत क्रांतिकारी आयुष वैद्यकीय अधिकारी संघटनेने दिलेल्या निवेदनासंदर्भात मुंबईतील विधानभवनात बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे आयुक्त अनुपकुमार यादव, वित्त विभागाचे प्रधान सचिव नितीन गद्रे आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

भरारी पथक नवसंजीवनी योजनेंतर्गत मानसेवी वैद्यकीय अधिकारी हे आदिवासी, अतिदुर्गम नक्षलग्रस्त भागात गेल्या १२ ते १५ वर्षांपासून कुपोषण निर्मूलनासाठी अविरत सेवा पुरवित आहेत. तसेच शासनाच्या आरोग्य सेवेच्या विविध योजना जनतेपर्यंत पोहोचविण्यात भरारी पथकातील वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांना वाढीव मानधन तातडीने उपलब्ध व्हावे, अशी सूचनाही श्री. पटोले यांनी केली.

Exit mobile version