Site icon साप्ताहिक एकच ध्येय

कोरोनाच्या गंभीर रुग्णांवर उपचारासाठी ‘टेलिआयसीयू’ तंत्रज्ञानाचा वापर! – आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबईसह राज्यात सात जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर वापर

मुंबई : अतिदक्षता विभागात (आयसीयू) उपचार सुरू असलेल्या कोरोनाच्या रुग्णांसाठी विशेषज्ञांचे मार्गदर्शन आणि उपचाराची सेवा तंत्रज्ञानाच्या मदतीने घेण्यात येणार आहे. त्यासाठी ‘टेलिआयसीयू’ सुविधेचा वापर केला आहे. मुंबई, ठाणे, जळगाव, सोलापूर, औरंगाबाद, अकोला आणि जालना या ७ जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर ही सुविधा सुरू करणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे सांगितले.

राज्यात उपचार सुरू असलेल्या कोरोनाच्या एकूण रुग्णांपैकी सुमारे ७५ टक्के रुग्णांना लक्षणे नाहीत. १० ते १५ टक्के रुग्णांना सौम्य लक्षणे आहेत. मात्र सुमारे तीन टक्के रुग्ण जे गंभीर आहे त्यांना अतिदक्षता विभागात उपचार आवश्यक आहेत. अशा रुग्णांवर उपचार करताना आयसीयूमधील जे विशेषज्ञ आहेत त्यांची संख्या वाढविली जात आहे. मात्र ‘मेडिस्केप’ या डॉक्टरांच्या फौडेशनमार्फत नवीन तंत्रज्ञानाचा वापर करीत ‘टेलिआयसीयू’ या तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा प्रस्ताव फाऊंडेशनने दिला आहे.

या फाऊंडेशनच्या माध्यमातून जिल्ह्यातील काही आयसीयूचे व्यवस्थापन केले जाणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. यासाठी आयसीयूमधील प्रत्येक बेडला लावलेल्या मॉनिटरवरील रुग्णाच्या वैद्यकीय स्थितीचे नियंत्रण ‘टेलिआयसीयू’ मार्फत केले जाईल. या सेवेच्या माध्यमातून तज्ञ डॉक्टर रुग्णाची स्थिती पाहून उपचाराचा सल्ला देखील देणार आहेत. सध्या सात जिल्ह्यांमध्ये ही सेवा प्रायोगिक तत्वावर उपलब्ध केली जाणार असून तीची यशस्विता पाहून राज्यातील अन्य जिल्ह्यातही सुरू केली जाईल, असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

Exit mobile version