Site icon साप्ताहिक एकच ध्येय

‘वंदे भारत’ अभियानांतर्गत १४ हजार ३४८ प्रवासी मुंबईत दाखल

आणखी ६९ विमानांनी येणार प्रवासी

मुंबई : वंदेभारत अभियानांतर्गत 89 विमानातून 14 हजार 348 प्रवासी विविध देशातून मुंबईत दाखल झाले आहेत. 1 जुलै 2020 पर्यंत 69 विमानांनी आणखी काही प्रवासी मुंबईत दाखल होतील.

आतापर्यंत ब्रिटन, सिंगापूर, फिलीपाईन्स, बांगलादेश, मलेशिया, कुवेत, इथियोपिया, अफगाणिस्तान, ओमान, दक्षिण अफ्रिका, इंडोनेशिया, नेदरलँड, जपान, श्रीलंका, म्यानमार, टांझानिया, स्पेन, आर्यलँड, कतार, हाँगकाँग, कझाकीस्तान, मॉरिशियस, ब्राझील, थायलंड, केनिया, मियामी, व्हियतनाम, इटली, स्विडन, रोम, जर्मनी, दुबई, मालावी, वेस्टइंडिज, नॉर्वे, कैरो, युक्रेन, रशिया, मादागास्कर, नायजेरिया अशा विविध देशातून प्रवासी मुंबईत दाखल झाले आहेत.

आलेल्या एकूण 14 हजार 348 प्रवाशांमध्ये 5298 प्रवासी मुंबईचे आहेत. 4672 प्रवासी हे उर्वरित महाराष्ट्रातील आहेत तर 4378 प्रवासी हे इतर राज्यातील आहेत. बृहन्मुंबईतील प्रवाशांसाठी संस्थात्मक कॉरंटाईनची सुविधा विविध हॉटेल्समध्ये करण्यात आली आहे. इतर जिल्ह्यातील व राज्यातील प्रवाशांना त्यांच्या जिल्हा मुख्यालयी पाठविण्याचे काम जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर यांच्या मार्फत करण्यात येत आहे. हे प्रवासी त्यांच्या जिल्ह्यात गेल्यानंतर त्यांच्या जिल्हाधिकारी तसेच महानगरपालिका आयुक्तांमार्फत त्यांना कॉरंटाईन करण्याचे काम करण्यात येत आहे.

महसूल व वन विभाग, आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन विभाग यांच्या दिनांक 24 मे 2020 च्या मार्गदर्शक सुचनेनुसार आलेल्या प्रवाशांना कॉरंटाईन करण्याचे काम करण्यात येत आहे. इतर राज्यातील प्रवाशांचे वाहतूक पासेस संबंधित राज्याकडून प्राप्त होईपर्यंत या प्रवाशांना मुंबईतील कॉरंटाईन सेंटरमध्ये ठेवले जात आहे तसेच या प्रवाशांचे वाहतूक पास संबंधित राज्याकडून प्राप्त होताच त्यांना त्यांच्या राज्यात पाठविण्यात येत आहे. वंदे भारत अभियान केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालय, विदेश मंत्रालय व केंद्रीय गृह मंत्रालय यांच्या समन्वयाने महाराष्ट्र शासन यशस्वीरित्या पार पाडत आहे.

Exit mobile version