चीनी सैन्यानं वादग्रस्त भागात बांधकाम करायचा प्रयत्न केल्यामुळं चकमक उडाल्याचं प्रधानमंत्री कार्यालयाचं स्पष्टीकरण
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि चीन या दोन देशांमध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षाबाबत बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत, पंतप्रधानांनी केलेल्या विधानांचा काहीजण चुकीचा अर्थ काढून खोडसाळपणा करत आहेत असं स्पष्टं करत, प्रधानमंत्री कार्यालयानं तसं न करण्याचं आवाहन केलं आहे.
प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर मोठ्या प्रमाणावर जमून, चिनी सैन्यानं वादग्रस्त भागात बांधकाम करायचा प्रयत्न केला. तसं न करण्याचा इशारा देऊनही त्यांनी काम सुरूच ठेवल्यानंतर भारतीय जवानांनी त्यांना साजेसं प्रत्युत्तर दिलं, असं प्रधानमंत्री कार्यालयानं आज सांगितलं.
म्हणूनच, प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर होणाऱ्या कुठल्याही आगळिकीला चोख प्रत्युत्तर देण्याची भारताची क्षमता असून, गलवान संघर्षात, भारताच्या हद्दीत कुणी घुसखोरी केलेली नाही अथवा भारतानं कुणाच्या हद्दीत अतिक्रमण केलेलं नाही, असं पंतप्रधानांनी सर्वपक्षीय बैठकीत सांगितल्याचं, प्रधानमंत्री कार्यालयानं नमूद केलं आहे.
या बैठकीत उपस्थित असलेल्या सर्वपक्षीय नेत्यांनीही याबाबत सरकारला आणि भारतीय लष्कराला एकमतानं पाठिंबा जाहीर केला, हा मुद्दाही प्रधामंत्री कार्यालयानं निदर्शनाला आणून दिला आहे.