कोविड-१९ चा प्रसार रोखण्यासाठी राज्यसरकारने केलेल्या प्रयत्नांची केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून प्रशंसा
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड १९ चा प्रसार रोखण्यासाठी महाराष्ट्र शासन आणि विशेषतः मुंबई महानगरपालिकेनं केलेल्या उपाययोजनांचे समाधानकारक परिणाम दिसत असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.
कोविड १९ चा प्रतिबंध करण्यासाठी केंद्रसरकारनं मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून त्यानुसार मुंबई महानगरपालिकेनं धारावीसारख्या दाट लोकवस्तीच्या भागात मोठ्या प्रमाणात कोविड चाचण्या आणि संशयित रुग्णांचा शोध घेतला, त्यामुळे इथल्या कोविड रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट दिसून येत आहे. एप्रिल महिन्यात धारावीमध्ये रुग्णवाढीचा दर १२ टक्के, तर दुपटीचा दर १८ दिवस होता. महानगरपालिकेच्या उपाययोजनांमुळे रुग्णवाढीचा दर कमी होऊन मे महिन्यात ४ पूर्णांक ३ दशांश टक्के तर जूनमध्ये १ टक्क्यावर आला, तर रुग्ण दुपटीचा दर मे महिन्यात ४३ दिवसांवर तर जून महिन्यात ७८ दिवसांवर आल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे.
दरम्यान टाळेबंदीमध्ये सूट देण्याची प्रक्रिया सुरु झाल्यावर उत्तर मुंबईतली मालाड, कांदिवली, बोरिवली आणि दहिसर या भागामध्ये कोरोनाच्या ७ हजार रुग्णांची भर पडली आहे.मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी याबाबत चिंता व्यक्त केली असून, परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी या भागात धारावीप्रमाणे कडक टाळेबंदी लागू करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंग चहल उद्या या भागाला भेट देणार असून या भागासाठी धडक उपाययोजना लागू करणार आहेत.